Ahmednagr Politics : महाराष्ट्रामधील निवडणुकांचा आज शेवट होईल. आज महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील मतदान आहे. अहमदनगर व शिर्डी साठी १३ मे ला मतदान झाले होते.
दरम्यान महाविकास आघाडीच्या निलेश लंके, भाऊसाहेब वाकचौरे या उमेदवारांबाबत व एकंदरीतच महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी मोठा विश्वास व्यक्त केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार देशात भाजप सरकारविरुद्ध मोठी लाट आहे.
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० च्या पुढे जागा येणार आहेत. आपण राज्यभर प्रचाराला फिरत असताना संगमनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगले नियोजन करून तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराचे काम केले. जिल्ह्यातील दोन्ही उमेदवार (लंके,वाकचौरे) महाविकास आघाडीचेच निवडून येणार आहेत.
असा आशावाद माजी मंत्री, आमदार बाळसाहेब थोरात यांनी व्यक्त केला. रविवारी (दि.१९) आमदार थोरात यांनी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील गावांमध्ये जाऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली असून, त्यासंदर्भाने तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
आमदार थोरात यांनी साकूर गटातील शेंडेवाडी, सतीची वाडी, हिवरगाव पठार, गिन्हेवाडी आदी ठिकाणी भेट दिली. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मीरा शेटे आदींसह अनेक मंडळी यावेळी उपस्थित होते.
मागील दोन-तीन महिने लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा सांभाळताना संपूर्ण राज्यभर दौरा करावा लागला. या सर्व प्रचार सभांना मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, असेही आमदार थोरात म्हणाले. एकंदरीतच अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांसह महाराष्ट्रातही मोठा विजय महाविकास आघाडीला मिळेल असे मत थोरात यांनी व्यक्त केले आहे.
आज (दि.२० मे) महाराष्ट्रातील उरलेल्या मतदार संघात मतदान आहे. यात मुंबईमधील सहा मतदार संघाचाही समावेश आहे. या मतदानाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.