Ajit Pawar On Nilesh Lanke : सध्या नगरसहित संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात पारनेरचे आमदार निलेश लंके हे चर्चेत आहेत. आमदार निलेश लंके हे सध्या अजित पवार यांच्या गटात आहेत. मात्र लवकरच ते हाती तुतारी घेतील आणि शरद पवार यांच्या गटात सामील होतील अशा चर्चा आहेत. गुरुवारी ते पुण्यात शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे विमोचन पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
विशेष म्हणजे गुरुवारी निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात सामील होतील अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. पण, निलेश लंके तसेच शरद पवार यांच्या माध्यमातून पक्षप्रवेशाबाबत अजूनही स्पष्टोक्ती मिळालेली नाहीये. मात्र मोठ्या साहेबांची भेट घेतल्यानंतर धाकट्या साहेबांचे म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाचे चिन्ह त्यांच्या गाडीवरून गायब झाले आहे आणि मोठ्या साहेबांचे म्हणजेच शरद पवार यांच्या गटाचे चिन्ह त्यांच्या गाडीवर पाहायला मिळत आहे.
हेच कारण आहे की निलेश लंके हे पवार यांच्या गटाकडून आगामी लोकसभेत नगर दक्षिण मधून महाविकास आघाडीचे असे मानले जाऊ लागले आहे. पण त्यांची भूमिका अजूनही तळ्यात-मळ्यात आहे. त्यामुळे निलेश लंके हे नेमका कोणता निर्णय घेणार, ते खरंच आगामी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीकडून लढणार का या साऱ्या गोष्टींबाबत आगामी काही दिवसातच समजू शकणार आहे.
दुसरीकडे निलेश लंके यांच्या प्रकरणात अजित दादा हे चांगलेच संतापलेले पाहायला मिळत आहेत. त्यांनी लंके यांना लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार असा इशारा दिला आहे. दरम्यान या संदर्भात लंके यांना विचारणा केली असता त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
काय म्हटलेत लंके
आमदार निलेश लंके यांना अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता त्यांनी असे म्हटले की, ‘शरद पवार यांची भेट झाली, तुतारीचे चिन्ह हाती घेतले म्हणजे आपण पक्षांतर केले असे नाही. तसेच याबाबत पुढे बोलताना त्यांनी दोघांची विचारधारा एकच आहे. एखादा पक्ष सोडून दुसऱ्याकडे गेले तर त्याला पक्षांतर म्हणता येईल. या बाबतीत तसे झालेले नाही. मी पुस्तक प्रकाशनासाठी तेथे गेलो होतो.
त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट म्हणून माझ्या हातात तुतारीचे चिन्ह दिले. मी तेथे गेलो म्हणून आमचे नेते अजित पवार लगेलच कारवाई करतील असे मला वाटत नाही. ते वरवर बोलत असले तरी आतून कसे आहेत हे मला माहिती आहे. माझे राजकीय नुकसान होईल, असा कोणताही निर्णय ते घेणार नाहीत,’ यावरून निलेश लंके यांची भूमिका अजून तळ्यात-मळ्यात असल्याचे स्पष्ट होते.
एकीकडे ते अजित दादा यांना आमचे नेते अशी कारवाई करणार नाहीत असं म्हणत अजूनही अजितदादा यांच्या गटातच असल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे साहेब म्हणजे शरद पवार जो आदेश देतील तो मला मान्य राहील असे म्हणत पक्षप्रवेशाच्या चर्चा जिवंत ठेवत आहेत. यावरून आगामी लोकसभेच्या निवडणुकीबाबत निलेश लंके यांची भूमिका क्लिअर झालेली नसल्याचे स्पष्ट होत आहे.
लोकसभा निवडणुक लढवणार का ?
निलेश लंके हे हाती तुतारी घेऊन नगर दक्षिण मधून भाजपाचे उमेदवार विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना आव्हान देणार अशा चर्चा आहेत. दरम्यान या संदर्भात त्यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी खूपच गोलमाल उत्तर दिले आहे. ते म्हटलेत की, ‘लोकसभा निवडणूक हा खूप मोठा विषय आहे. विधानसभा सोपी असते.
लोकसभेला सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. तेथे पोहचण्यासाठी मोठी यंत्रणा लागते. मी सामान्य समाजसेवा करणारा कार्यकर्ता आहे. निवडणुकीत उतरलेल्या प्रस्थापितांसारखी माझ्याकडे यंत्रणा नाही. जी आहेत ती जीवाभावाची माणसे आहेत. मात्र, त्यांनाही त्यांच्या अडचणी आणि मर्यादा आहेत.’ पुढे बोलताना त्यांनी सांगितले की मी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
मात्र सर्वांशी बोलून, जाणकारांशी चर्चा करून, वास्तवाची जाणीव ठेवूनच आपण यावर निर्णय घेणार असे देखील त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे निलेश लंके यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. लंके आगामी लोकसभेत सुजय विखे यांच्या विरोधात निवडणुकीत उभे राहणार का हे पाहणे विशेष खास राहणार आहे.