Balasaheb Thorat On Nilesh Lanke : अजितदादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे लवकरच शरद पवार यांच्या गटात जाणार अशा चर्चा आहेत. सध्या स्थितीला पक्षप्रवेशाच्या फक्त चर्चा असल्या तरी देखील लंके यांच्या राजकीय हालचाली आता त्यांच्या पक्षप्रवेशाची फक्त औपचारिकता शिल्लक असल्याचे सांगत आहेत. कारण की निलेश लंके यांच्या गाडीवरील अजितदादा यांच्या गटाची निशाणी गायब होत त्या ठिकाणी शरद पवार गटाची तुतारी निशाणी आली आहे.
लंके यांनी देखील साहेब जो आदेश देतील तो मान्य असेल असे नुकतेच म्हटले आहे. दुसरीकडे मोठ्या साहेबांनी अर्थातच शरद पवार यांनी देखील निलेश लंके यांचे स्वागत केले आहे. मात्र दोन्ही नेत्यांनी अजूनही निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाची कबुली दिलेली नाही.
परंतु त्यांच्या राजकीय हालचाली पाहता ते शरद पवार यांच्या मागावर आहेत हे स्पष्ट होत आहे. यामुळे जर निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात गेलेत तर ते महाविकास आघाडीकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निवडणुकीत उभे राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
खरेतर लंके यांची आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. यासाठी ते गेल्या दोन वर्षांपासून मेहनत घेत आहेत. यामुळे जर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना उमेदवारी मिळाली तर डॉक्टर सुजय विखे यांना तगडे आव्हान मिळेल असे बोलले जात आहे.
याचे कारण असे की, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सारे विखे विरोधी निलेश लंके यांना सपोर्ट करणार आहेत. विखे यांचा पक्षांतर्गत वैर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना स्व पक्षातून विधान परिषदेचे भाजपा आमदार राम शिंदे आणि जिल्ह्यातील युवा नेते विवेक कोल्हे यांच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे.
दुसरीकडे, कर्जत जामखेडमधून रोहित पवार, राहुरी मधून प्राजक्त तनपुरे हे देखील निलेश लंके यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. श्रीगोंद्यामध्ये भाजपचे बबनराव पाचपुते आणि शेवगाव मध्ये मोनिका राजळे हे भाजपाचे आमदार आहेत.
मात्र, पक्षांतर्गत विरोध आणि महाविकास आघाडी मधील आमदार यांचा त्यांना सपोर्ट राहणार असल्याने नगर दक्षिणची आगामी लोकसभा निवडणूक काटेदार होणार आहे. शिवाय सुजय विखे यांच्यापुढे बाळासाहेब थोरात यांचे देखील मोठे आव्हान राहणार आहे.
थोरात हे विखे पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जातात. नगर जिल्ह्यात थोरात विरुद्ध विखे यांचे राजकीय वैर कोणापासूनच लपून राहिलेले नाही. यामुळे आगामी निवडणुकीत सुजय विखे यांचा पराभव व्हावा आणि निलेश लंके विक्रमी मताधिक्यांनी निवडून यावेत यासाठी बाळासाहेब थोरात आपली पूर्ण ताकत लावणार आहेत.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निलेश लंके जर शरद पवार गटात आलेत आणि ते अहमदनगर दक्षिणमधून निवडणूक लढलेत तर त्यांचा निश्चितच विजय होईल असे म्हटले होते. थोरात यावेळी असे म्हटले होते की, ‘निलेश लंके यांनी खूप लोकप्रियता मिळवली आहे. सर्वसामान्य तरुण, काम करणारे तरुण असे त्यांचे उदाहरण झाले आहे. यामुळे ते नगर दक्षिणमधून जर उभे राहिले तर मोठ्या मताने विजयी होतील असा मला विश्वास आहे.’
अर्थातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे देखील लंके यांना विजयी गुलाल उधळवण्यासाठी हातभार लावणार आहेत. यामुळे ‘अबकी बार नगर दक्षिणची लोकसभा निवडणूक काटेदार’ असे काहीसं चित्र तयार होण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी आता महाविकास आघाडीतून खरंच निलेश लंके यांना अहमदनगर दक्षिणसाठी तिकीट मिळते का ? हे देखील विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.