Ahmednagar Politics : सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वच पक्षाच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी मुंबई येथे बुधवारी (दि. ६) आयोजित केलेल्या बैठकीस पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी पाठ फिरविली. आ. लंके यांच्या गैरहजेरीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जावू लागले आहेत,
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुंबईत आढावा बैठक आयोजित केली होती. बैठकीस उपमुख्यमंत्री अजितदादा, कृषीमंत्री धनंजय मुंढे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अजितदादा गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
नगर दक्षिणेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. दक्षिणेतील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. नगर शहराचे आ. संग्राम जगताप हेही उपस्थित होते. या बैठकीस आ. लंके उपस्थित राहणार का?
याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आ. लंके यांनी बैठकीस पाठ फिरविल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दक्षिणेतील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे वरिष्ठांनी जाणून घेतले.
दरम्यान आ. निलेश लंके, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटात सक्रिय होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आ. लंके यांनी त्या चर्चेस दुजोरा दिला नसला तरी लंके दाम्पत्यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. तशा प्रकारच्या हालचाली गतीमानही झाल्या आहेत.
नगरला नुकतेच शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्य प्रयोग पार पडले. या महानाट्यात शरद पवार गटाचे खा. अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली.
महानाट्याच्या समारोपात खा. कोल्हे यांनी आ. लंके यांनी दक्षिणेतून स्वाभीमानाची तुतारी वाजवावी असे वक्तव्य करून त्यांना पवार गटात येण्याची साद घातली होती, म्हणूनच आ. लंके अजितदादांनी मुंबई येथे आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित राहणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.