विधानसभा निवडणूक

नगर शहर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर ! संग्रामभैया जगताप यांची हॅट्रिक

Maharashtra Assembly Election : अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर शहर विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप आणि महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र येथून अजित पवार गटाचे संग्राम भैय्या जगताप यांनी विजय मिळवला आहे.

संग्राम भैय्या जगताप हे मतमोजणी सुरू झाल्यापासून आघाडीवर होते. पहिल्या राऊंड पासून जगताप यांनी आपला दबदबा कायम ठेवला. सर्वच फेऱ्यांमध्ये जगताप हे आघाडीवर राहिलेत. खरे तर विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप यांनी मतदार संघात अनेक विकास कामे केलीत. शहरातील अनेक महत्वाची प्रश्न त्यांनी सोडवलीत. निवडणूक प्रचारादरम्यान जगताप नगर शहर विधानसभा मतदारसंघाला एक नंबर करायचे आहे असे सातत्याने सांगत आले होते.

त्यांचे कार्यकर्ते देखील मतदार संघात मोठे ऍक्टिव्ह होते. त्यांचा जनसंपर्क देखील खूपच दांडगा होता. मतदार संघात फिरत असताना जगताप यांना मतदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत होता. यामुळेच संग्राम जगताप हे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. त्यांनी सलग तीन वेळा नगर शहर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला असून जगताप यांच्या हॅट्रिकमुळे सध्या त्यांच्या समर्थकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे.

खरेतर, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट , शिवसेना एकनाथ शिंदे गट शिवसेना उद्धव ठाकरे गट भाजप आणि काँग्रेस हे सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते. यामुळे यंदाची निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली. यंदा बंडखोरांचे प्रमाण सुद्धा अधिक होते. यामुळे अनेक ठिकाणी दिग्गज उमेदवारांना याचा फटका बसणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

दरम्यान आता राज्यातील बहुतांशी जागांवरील निकाल जाहीर झाले असून सध्या स्थितीला महायुतीला पूर्ण बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. महायुती सध्या स्थितीला तब्बल 222 जागांवर आघाडी घेऊन आहे. तर महाविकास आघाडीला 49 जागांवर आघाडी असून इतर 17 उमेदवार आघाडीवर आहेत. महायुती मधील भारतीय जनता पक्ष 127 जागा, शिवसेना शिंदे गट 56 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 39 जागांवर आघाडीवर आहे.

महाविकास आघाडी बाबत बोलायचं झालं तर काँग्रेस 19 जागा, शिवसेना ठाकरे गट अठरा जागा, राष्ट्रवादी शरद पवार गट 12 जागांवर आघाडीवर आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात संग्राम भैय्या जगताप हे 18 व्या फेरीअखेर 32 हजार 205 मतांनी आघाडीवर होते. दरम्यान, शेवटच्या फेरी अखेर जगताप 39 हजार 650 मतांनी विजयी झालेत. त्यांनी शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांचा पराभव केला आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Recent Posts