Ahilyanagar Politics : लोकसभेसाठी अहमदनगर अर्थात दक्षिणेची जागा भाजपकडून खा. सुजय विखे हे लढणार हे निश्चित झाले होते. परंतु त्यांच्या विरोधात कोण असेल, निलेश लंके असतील की आणखी कोणी असेल अशा चर्चा होत्या.
पण आता निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन लोकसभेसाठी उडी घेतली आहे. त्यासाठी त्यांना आता राष्ट्रवादीमधून पक्ष बदलून शरद पवार गटात यावे लागणार आहे. दक्षिण लोकसभेचा विचार जर केला
तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर दक्षिणेत पक्ष बदलून लढणारे निलेश लंके पाचवे उमेदवार आहेत. याआधी असा प्रयोग चहर वेळा झाला आहे. यातील एक उमेदवार सोडला तर बाकी विजय झाले आहेत.
आमदार निलेश लंके यांनी पारनेर मतदारसंघाच्या आमदारीचा राजीनामा देऊन तुतारी फुंकली. सुपा येथे आ.लंके यांनी कार्यकत्यांचा मेळावा घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. लोकसभेच्या तोंडावर दुसऱ्या पक्षात दाखल होऊन उमेदवारी लढवणारे आ. लंके हे पाचवे उमेदवार आहेत.
‘असा’ आहे दक्षिणेचा इतिहास
अहमदनगर लोकसभा जागेवर पक्ष बदलून उमेदवारी करण्याचे प्रयोग या आधीही झाले आहेत. १९९८ ते २०२४ या कालावधीत सर्वप्रथम सन्माननीय दिवंगत बाळासाहेब विखे यांनी पक्ष बदलून शिवसेनेकडून निवडणूक लढवली व यशस्वी ठरले.
पक्षांकडून विजयाला गवसणी घालण्यासाठी उमेदवारांची केलेली खांदेपालट तसेच उमेदवारी मिळवण्यासाठी झालेली बंडखोरी हे लोकसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य राहिले आहे. १९९८ साली सन्माननीय दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करत निवडणूक लढवली होती.
त्यात ते विजयी झाले होते. त्यानंतर २००४ साली तुकाराम गडाख यांनी राष्ट्रवादीत जात निवडणूक लढवत विजयी झाले होते. २०१४ साली राजीव राजळे हे राष्ट्रवादीत जात निवडणूक लढवली. ते पराभूत झाले होते.
त्यानंतर २०१९ साली खा.सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये जात निवडणूक लढवली त्यात ते विजयी झाले. आता २०२४ ला निलेश लंके यांनी शरद पवार गटात उडी मारत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.