Nilesh Lanke News : सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघातील आमदार निलेश लंके चर्चेत आले आहेत. आमदार निलेश लंके सध्या अजितदादा यांच्या गटात सहभागी असून ते महायुतीचा एक भाग आहेत.
मात्र गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके अजितदादांना सोडचिट्टी देतील आणि पुन्हा एकदा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा सुरू आहेत. आज सकाळी अचानक मात्र या चर्चांनी अधिक वेग पकडला.
आज निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात प्रवेश करतील अशा चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये पाहायला मिळाल्यात. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणमध्ये डॉक्टर सुजय विखे यांच्याविरुद्ध आमदार निलेश लंके यांची रंगतदार लढत पाहायला मिळेल अशा चर्चा सुरू होत्या.
मात्र या चर्चांना आता पूर्णविराम लागणार आहे. कारण की, निलेश लंके यांच्या घरवापसी संदर्भात शरद पवार यांनी स्वतः प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे. शरद पवार यांनी आमदार लंके यांच्या घरवापसीच्या चर्चा तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे.
याबाबत आता आमदार निलेश लंके यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. निलेश लंके यांनी प्रसार माध्यमांमध्ये सुरू असलेल्या या साऱ्या चर्चा निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे.
निलेश लंके यांनी दिले स्पष्टीकरण
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात घर वापसी संदर्भात निलेश लंके यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हटले की, “माझ्या प्रवेशाच्या अफवा आहेत.
प्रवेश असता तर कार्यकर्त्यांसोबत आलो असतो, कोणीतरी अफवा पसरवत आहे. मला माझ्या नेतृत्वाने सांगितलं तर नगरच्या जागांसाठी काम करेल.
पक्षप्रवेशाविषयी अजून काहीच नाही. मोठ्या साहेबांनी (शरद पवार यांनी ) याबाबत कुठलं तथ्य नसल्याचे सांगितले आहे. मी आता दादांसोबत आहे.” तसेच लंके यांनी अमोल कोल्हे यांच्याशी झालेल्या भेटीबाबत देखील स्पष्टीकरण दिले आहे.
ते म्हटलेत की, “माणूस हा नेहमी खेळाडू पाहिजे. स्पर्धा असो किंवा नसो स्पर्धेची तयारी करत असतो. मी खेळ खेळणारा माणूस आहे, मी नाश्ता करण्यासाठी गेस्ट हाऊसला आलो होतो.
त्यावेळी कोल्हे भेटले. अमोल कोल्हे यांचे महानाट्य झालं त्याच्यानंतर आमची चर्चा नव्हती त्यामुळे भेटलो,” असे लंके यांनी यावेळी म्हटले आहे.