Nilesh Lanke News : गेल्या काही दिवसांपासून नगरच्या राजकारणाविषयी मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत अजितदादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके. खरेतर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून बीजेपीचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान खासदार महोदय यांना दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने तिकीट दिले आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मात्र या जागेवरून अजूनही उमेदवार निश्चित झालेला नाही. आतापर्यंत निलेश लंके यांचे नाव हे या शर्यतीत टॉपवर होते. गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके हे अजितदादा यांची साथ सोडत पुन्हा एकदा मोठ्या साहेबांकडे जातील आणि हाती तुतारी घेऊन नगर दक्षिण मधून सुजय विखे यांना आव्हान देतील अशा चर्चा सुरू आहेत.
विशेष म्हणजे स्वतः निलेश लंके यांनी देखील वारंवार आपण लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे आणि यासाठी तयारी देखील सुरू असल्याचे म्हटले आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी या संदर्भात निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या समवेत चर्चा देखील केली. मात्र त्यावेळी या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुप्रिमो शरद पवार तथा निलेश लंके यांनी मौन बाळगले.
यानंतर शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निलेश लंके हे आमचे उमेदवार व्हावेत असे आमचे मत असल्याचे सांगितले. ते नगरमधील लोकप्रिय नेते आहेत. त्यांनी येथून निवडणूक लढवली तर ते शंभर टक्के जिंकतील.
परंतु त्यांना अडचण निर्माण होईल असे वक्तव्य मी करणार नसल्याचे सांगत जयंत पाटील यांनी मोठ्या हुशारीने त्यांच्या पक्षप्रवेशाच्या आणि उमेदवारीच्या चर्चा जीवित ठेवल्या मात्र ते खरंच महाविकास आघाडीचे उमेदवार राहतील का याबाबत योग्य वेळी सोपस्कार करू असं म्हणत निलेश लंके यांच्या उमेदवारीवर संभ्रम कायम ठेवण्याचे काम केले.
अशातच आता निलेश लंके यांची नवीन भूमिका समोर आली आहे. निलेश लंके हे स्वतः नगर दक्षिण मधून निवडणूक लढवणार नसल्याचे बोलले जात आहे. निलेश लंके हे त्यांची पत्नी राणी लंके यांना नगर दक्षिणमधून निवडणुकीसाठी उभे करणार असा दावा होऊ लागला आहे.
निलेश लंके हे पत्नी राणीताई लंके यांना लोकसभेसाठी तिकीट मिळावे याकरिता आग्रही असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर येत आहे. यामुळे नगरच्या राजकारणात पुन्हा विविध चर्चांना उधाण आले आहे. चर्चा जरूर नवीन आहे मात्र केंद्रस्थानी निलेश लंकेच आहेत. खरेतर सध्या स्थितीला निलेश लंके हे अजितदादा यांच्या गटात आहेत.
आता जर त्यांना स्वतः निवडणूक लढवायची असेल तर अजित दादा यांच्या पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल, आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल आणि यानंतर मग त्यांना शरद पवार यांच्या पक्षाकडून लोकसभेसाठी उमेदवारी मिळणार आहे. आता या साऱ्या तांत्रिक बाबी पाहता निलेश लंके हे स्वतः निवडणूक लढवण्याऐवजी आपल्या पत्नीला लोकसभेचे तिकीट मिळावे यासाठी आग्रही असल्याचे म्हटले जात आहे.
मात्र शरद पवार हे निलेश लंके हेच निवडणुकीत उभे राहिले पाहिजेत, या आपल्या निर्णयावर ठाम आहेत. एकंदरीत निलेश लंके यांच्या या नवीन भूमिकेमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे. यामुळे आता महाविकास आघाडीकडून या जागेवर कोणाला उमेदवारी मिळते, डॉक्टर सुजय विखे यांच्या विरोधात कोण उभे राहणार हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.