Nilesh Lanke : गेल्या काही दिवसांपासून पारनेरचे आमदार निलेश लंके चर्चेत आले आहेत. ते नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी आधीच तयारी देखील सुरू केलेली आहे. आता ते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करतील आणि नगर दक्षिण मधून तुतारी फुंकणार अशा चर्चा आहेत.
पण, याबाबत अजूनही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. शरद पवार आणि निलेश लंके यांची पुण्याला नुकतीच भेट झाली होती. त्यावेळी निलेश लंके यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन देखील झाले. त्याचवेळी ते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
पण या दोन्ही नेत्यांनी पक्षप्रवेशासंदर्भात अजूनही आपली भूमिका क्लियर केलेली नाही. यामुळे लंके यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षाला पारनेरचे आमदार निलेश लंके हे खासदारकीसाठी हवे आहेत.
निलेश लंके यांची देखील नगर दक्षिणमधून निवडणूक लढण्याची इच्छा आहे. पण, ते सध्या सावध पवित्रा घेत आहेत. शरद पवार गट आणि निलेश लंके तडकाफडकी कोणताच निर्णय घेण्याच्या मूडमध्ये नाहीत. मात्र लंके यांच्या पक्षप्रवेशाची आता फक्त औपचारिकता शिल्लक असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
कारण की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लंके यांच्या संदर्भात नुकतेच एक मोठे विधान केले आहे. यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात महायुतीचे उमेदवार अन विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांचीच यंदा लढत रंगणार अशा चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निलेश लंके संदर्भात बुधवारी एक मोठे विधान केले आहे. ते म्हटलेत की, ‘लंके हे अहमदनगर मधील लोकप्रिय नेते आहेत. तेथून उभे राहिले तर शंभर टक्के निवडून येणार आहेत.
यामुळे ते आमचे उमेदवार व्हावेत असे आमचे मत आहे. याबाबतीत आम्ही योग्य वेळी सोपस्कार करू. मी निलेश लंके यांना तुतारी भेट दिली होती. ती तूतारी त्यांनी हाती घेतली. परंतु मी असे कोणतेही वक्तव्य करणार नाही ज्यामुळे ते अडचणीत येतील.’
याशिवाय त्यांनी नगर दक्षिण मधून यंदा तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही, ही जागा आम्ही जिंकल्या शिवाय स्वस्त बसणार नाही असेही यावेळी म्हटले आहे. एकंदरीत त्यांनी निलेश लंके हे शरद पवार गटाचे नगर दक्षिणमधील अधिकृत उमेदवार असू शकतात असे संकेत दिलेले आहेत.
तसेच याबाबतचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असे देखील त्यांनी म्हटले आहे. सध्या स्थितीला मात्र निलेश लंके हे अजित दादा यांच्या गटात असल्याने पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी शरद पवार गट आणि स्वतः निलेश लंके हे सावध पवित्रा घेत आहेत.
मात्र यासंदर्भात निलेश लंके आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून लवकरच निर्णय घेतला जाईल आणि या जागेवर महाविकास आघाडीकडून नेमकी कोणाला संधी मिळेल हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे.