Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil : सध्या नगर दक्षिणमध्ये राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांना पहिल्यांदा खासदारकीसाठी संधी दिली आहे.
सध्या या दोन्ही उभय गटाकडून आपापल्या अधिकृत उमेदवारासाठी प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे नगर दक्षिणचे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. सुजय विखे पुन्हा एकदा खासदार म्हणून दिल्लीत जावेत यासाठी महायुतीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे.
महायुतीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून प्रचारात सुजय विखे यांची स्पेशल यंत्रणा देखील कार्यरत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे निलेश लंके यांनी देखील जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे सुजय विखे आणि त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांना त्रास दिला असल्याचा आरोप करत आहेत. मात्र त्यांचा हा आरोप एकेकाळी निलेश लंके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या अजित दादा गटानेच खोडून काढला आहे.
यामुळे निलेश लंके यांच्या आरोपात कितपत तथ्य आहे हा मोठा विश्लेषणात्मक विषय बनला आहे. विखेंनी त्रास दिल्याचे एक उदाहरण पुराव्यानिशी दाखवावे असे चॅलेंज अजित दादा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी लंके यांना दिले आहे.
नाहाटा यांना अजितदादा यांनी जिल्हाध्यक्ष पदावर बसवल्यानंतर त्यांनी नगरमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित दादा पवार गट) सुजय विखे यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर मेळावा आयोजित केला असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी नाहाटा यांनी अजितदादा यांनी पारनेर मतदारसंघासाठी 350 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करून दिला, अजित दादांनी लंके यांच्यावर अन्याय केला नाही, परंतु लोकसभा निवडणूक लढवण्याच्या महत्त्वाकांक्षेने त्यांनी दुसऱ्या गटाकडून उमेदवारी केली असल्याचे म्हटले आहे.
तसेच विखे यांनी त्रास दिल्याचे लंके सांगतात. मात्र, विखेंनी त्यांना त्रास दिल्याचे एखादे उदाहरण पुराव्यानिशी त्यांनी द्यावे, असे थेट चॅलेंजच नाहाटा यांनी लंकेंना दिले आहे. यावेळी, लंकेंनी आमदारकीचा आधीच राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीने त्यांना पक्षातून काढून टाकलेले नाही.
तसेच त्यांनी पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला की नाही याची माहिती मला नाही, असंही नाहाटा यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर त्यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार हा फक्त सोशल मीडियावर आहे ग्राउंडवर मात्र वस्तुस्थिती वेगळी असल्याचा दावा केला आहे.
एकंदरीत विखे यांनी आपल्याला व आपल्या कार्यकर्त्यांना खूप त्रास दिला असल्याचा हा लंके यांचा दावा एकेकाळी त्यांच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या अजितदादा गटानेच खोडून काढला आहे.