Ahmednagar Politics : राज्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवारांना निवडणूक सोप्पी नाही, हे आम्ही यापुर्वीच सांगितलं होतं. आता ती का सोप्पी नाही, याचे पुरावे हळूहळू समोर येऊ लागले आहेत. चार दिवसांपूर्वी जामखेड तालुक्यातील ज्येष्ठ नेते व शरद पवार गटाचे विधानसभा प्रमुख मधुकर राळेभात यांनी रोहित पवारांना थेट बारामती दाखवली. पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा देत आबांनी दादांवर रोखठोक टिका केली. शिवाय यावेळी मतदारसंघात आपला-बाहेरचा होणारच, असं सांगून विधानसभेचं अप्रत्यक्ष भाकीतच सांगितलं. आता याच मधुकर आबा राळेभात यांना भाजपचे आमदार राम शिंदे यांनी भाजपात यायची ऑफर दिली. आपल्या फेसबुक या सोशल मीडियातून त्यांनी आबांना आमंत्रणच दिलं. आबांचं सोडून जाणं, रोहित पवारांसाठी धोक्याची घंटा ठरेल का, हेच आपण पाहणार आहोत…
मधुकर आबा राळेभात हे जामखेड तालुक्यातील ज्येष्ठ नेते. जामखेडच्या राजकारणावर त्यांचा चांगला प्रभाव आहे. २००९ साली त्यांनी अपक्ष उभे राहत, विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी निवडून आलेल्या राम शिंदे यांच्यापेक्षा फक्त १४ हजार मते त्यांना कमी मिळाली होती. या आकड्यांवरुन राळेभात यांचा तालुक्यावरील प्रभाव दिसून येतो. आजही त्यांचा जामखेड तालुक्यावर चांगला होल्ड आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी रोहित पवारांची धुरा वाहिली. रोहित पवारांच्या विजयात त्यांचा मोठा वाटा राहिला होता. आता मात्र पक्षात सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याचे सांगत त्यांनी रोहित पवारांवर हुकुमशाहीचा आरोप केला. पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नसल्यानं आपण पक्ष सोडतोय, असं त्यांनी जाहिर केलं. शिवाय एखाद्या पक्षाने संधी दिली तर रोहित पवारांविरोधातही आपण उभं राहू, असंही सांगून टाकलं.
आबांनी रोहित दादांना सोडलं, ही झाली पहिली बातमी. पण दुसरी बातमी यापेक्षा जास्त इंटरेस्टींग आहे. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर राळेभात हे कोणत्या पक्षात जातील, याची उत्सुकता होती. मात्र ती उत्सुकता आमदार राम शिंदेंनी आणखी वाढवली. राम शिंदे यांनी राळेभातांना थेट भाजपमध्ये येण्याची ऑफर देऊन टाकली. आ. राम शिंदे यांच्या या खुल्या ऑफरने मात्र कर्जत-जामखेडच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला. या ऑफरमागे अनेक कारणे असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते. त्यापैकी पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, आबांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता.
मधुकर राळेभात हे जामखेडच्या राजकारणातलं लोकप्रिय नाव आहे. पंधरा वर्षांपूर्वी झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीत आबांनी अपक्ष लढूनही २८ हजारांपेक्षा जास्त मतं घेतली होती. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली नसली तरी तालुक्यात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यंदा भाजप राम शिंदेंना तिकीट देणार नसल्याच्या चर्चा आहेत. शिवाय महायुती अजित पवार गटाला कर्जत-जामखेडची जागा सोडेल, अशाही चर्चा आहेत. आता या दोन्ही शक्यतांचा विचार केला तर आबा भाजपसोबत असतील तर सहज जिंकून येता येऊ शकतं, असा राम शिंदेंचा अंदाज असावा. कारण गेल्यावेळी रोहित पवारांसोबत असलेल्या राळेभातांची उपयुक्तता विरोधकांनी पाहिली आहे. रोहित दादांच्या त्यावेळच्या विजयात राळेभातांचाही मोठा वाटा होता.
त्यामुळे जर भाजपला यंदा नवा चेहरा शोधायचा असेल, तर राळेभातांना नक्कीच उमेदवारीची संधी मिळू शकते. राम शिंदेंसाठीही राळेभातांची उमेदवारी ही जमेची बाजू राहू शकते. त्यामुळेच कदाचित त्यांना भाजपात येण्याची ऑफर दिली असावी, असं विश्लेषकांना वाटतंय. जर येथून थेट अजित पवारच उभे राहिले तरीही, राळेभातांना एखादी दुसरी मोठी संधी देऊन अजितदादांच्या विजयात भागीदार करता येऊ शकतं. महायुतीत कुणालाही जागा सुटली तरी, आबांची उपयुक्तता राम शिंदेंना माहित असल्यामुळेच त्यांनी राळेभातांना थेट ऑफर दिली असावी, अशी शक्यता आहे.