Panjabrao Dakh News : महाराष्ट्रातील राजकारणातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्याच्या परभणी लोकसभा मतदारसंघातून ही बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परभणीतील हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे अपक्ष निवडणूक लढवणार नसून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणार आहेत. खरेतर डख हे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. त्यांचे हवामान अंदाज शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय होत असतात. हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा पंजाबरावांच्या हवामान अंदाजावर विश्वास ठेवणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात पाहायला मिळतो.
शेतकऱ्यांच्या मते पंजाबरावांचा हवामान अंदाज हा तंतोतंत खरा ठरतो. यामुळे त्यांना शेती करताना याचा मोठा फायदा होतो. दरम्यान शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय पंजाबराव आता निवडणुकीच्या आखाड्यात आपले नशीब आजमावणार आहेत.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंजाबरावांनी स्वतः खासदारकीची निवडणूक लढवणार असे जाहीर केले होते. मात्र त्यावेळी त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. आता मात्र पंजाबरावांच्या निवडणूक उमेदवारीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
ती म्हणजे पंजाबराव डख अपक्ष निवडणूक लढवणार नसून ते वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राहणार आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने परभणी लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना लोकसभेचे तिकीट जाहीर केले आहे.
वंचित बहुजन आघाडीने परभणी लोकसभा मतदारसंघात आधीच आपल्या उमेदवाराची घोषणा केली होती. मात्र आता वंचितने आपला तेथील उमेदवार बदलून पंजाबरावांना संधी देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. वंचितने आधी या जागेसाठी बाबासाहेब उगले यांचे नाव जाहीर केले होते.
पण उमेदवारी जाहीर केल्यानंतरही वंचितने या जागेवरील उमेदवार बदलून जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी देण्याचा मोठा निर्णय घेतला असून पंजाबरावांनी आपला उमेदवारी अर्ज देखील भरला आहे हे विशेष.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, परभणी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून संजय उर्फ बंडू जाधव हे लोकसभेच्या रिंगणात उतरवले गेले आहेत आणि महायुतीने या जागेवर महादेव जानकर यांना संधी देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
त्यामुळे आता महादेव जानकर आणि संजय उर्फ बंडू जाधव या राजकारणातील धुरंदर लोकांच्या विरोधात राजकीय पार्श्वभूमी नसलेले पंजाबराव डख यांचा कितपत निभाव लागतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
पंजाबरावांची शेतकऱ्यांमध्ये असणारी लोकप्रियता साधण्याचा डाव वंचितने खेळला आहे. मात्र पंजाबराव महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना आगामी निवडणुकीत कितपत आव्हान देऊ शकतात हे तर येणारा काळच सांगणार आहे.
पण, पंजाबरावांच्या इंट्रीमुळे परभणी लोकसभा मतदारसंघातील राजकीय लढत तिरंगी तर होणारच आहे शिवाय अतिशय निवडणुक लढत खूपच काटेदार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.