Panjabrao Dakh : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. नुकताच मराठवाड्यातील परभणी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत वंचित बहुजन आघाडीने मोठा निर्णय घेतलेला आहे.
वंचितने परभणीतला आपला आधीचा उमेदवार बदलत त्या ठिकाणी पंजाबराव डख यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. आधी वंचित बहुजन आघाडीने या जागेवर बाबासाहेब उगले यांनाउमेदवारी दिली होती.
आता मात्र या जागेवरून पंजाबराव हे निवडणूक लढवणार आहे. खरेतर, पंजाबराव डख यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र नंतर वंचितने पंजाबरावांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. यानुसार पंजाबरावांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. त्यामुळे सध्या वंचितने परभणी मधून उमेदवारी जाहीर केलेले पंजाबराव डख नेमके आहेत तरी कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान आज आपण पंजाब रावांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोण आहेत पंजाबराव
पंजाबराव डख हे परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगाव येथील रहिवासी आहेत. पंजाब रावांनी बीए पर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. त्यांनी सीटीसीए आणि एटीडी सुद्धा केले आहे. ते काळी काळ त्यांच्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेवर अंशकालीन शिक्षक म्हणून नोकरीला होते. पण सध्या ते शेती करत आहेत. त्यांच्याकडे दहा एकर शेती आहे. यात ते सोयाबीन आणि हरभरा पिकाचे उत्पादन घेतात.
याशिवाय ते शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज देतात. ते शेतकऱ्यांना हवामान बदलाची माहिती देतात. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा पंजाबरावांच्या हवामान अंदाजावर मोठा गाढा विश्वास आहे. पंजाबराव व्हाट्सअप ग्रुप, फेसबुक तथा यूट्यूब च्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना हवामानाचे अंदाज देत आहेत. शेतकऱ्यांच्या मते भारतीय हवामान विभागापेक्षा पंजाब रावांचे हवामान अंदाज हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहेत.
पंजाब रावांचे हवामान अंदाज अगदी सोप्या भाषेत असतात. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार, कोणत्या जिल्ह्यात उष्णता वाढणार याची ते माहिती देतात. शेतकऱ्यांमध्ये पंजाबराव डख खूपच लोकप्रिय आहेत यात शंकाच नाही मात्र काही वेळा त्यांचे देखील हवामान अंदाज चुकतात आणि अशावेळी शेतकऱ्यांच्या नाराजीचा त्यांना सामना करावा लागतो.
डख अलीकडे हवामान बदलाचे अंदाज व्यक्त करणारे व्हिडिओ आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करत आहेत. यामुळेच ते प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. दरम्यान शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेले पंजाबराव डख आता खासदारकीच्या निवडणुकीत उतरले आहेत. ते वंचित बहुजन आघाडीचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत.
परभणी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत
महायुतीने परभणीत ओबीसी मतदानाचा विचार करून रासप नेते महादेव जानकर यांना तिकीट दिले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने या जागेवरून शिवसेना उबाठा गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव यांना तिकीट दिले आहे.
आता वंचितने पंजाब डख यांना येथून तिकीट दिले असल्याने या जागेवरील लोकसभा मतदारसंघाची निवडणूक खूपच काटेदार होणार आणि तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.