विधानसभा निवडणूक

Parner Vidhansabha : पारनेरचं गणित यंदा अवघडच, लंकेच्या पराभवासाठी प्यादे सरकले

निलेश लंके हे राजकारणात अत्यंत सावधपणे पाऊले टाकतात. याची प्रचिती अनेकदा आलीय. लोकसभा निवडणुकीपूर्वी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत निलेश लंके आपण शरद पवार गटात जाणार नसल्याचं सांगत होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही दिवस आधी त्यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांची तुतारी हाती घेतली. सुरुवातीला आपल्या पत्नी राणी लंकें यांच्या उमेदवारीसाठी निलेश लंके यांची तयारी सुरु असल्याचं भासवलं गेलं. मात्र ऐनवेळी राणी लंकेंना पाठीमागे ठेऊन निलेश लंके यांनीच अर्ज भरला आणि निवडणुकही जिंकली.

खरंतर त्यावेळी लोकसभेच्या उमेदवार म्हणून दक्षिणेत राणी लंकेंचे पोस्टर्स झळकविण्यात आले होते. राणी लंकेंनी या मतदारसंघात यात्राही काढली होती. मात्र लंकेंनी गनिमी कावा खेळत अजानक अर्ज भरला होता. त्यामुळे आताही निलेश लंके असाच गनीमी कावा खेळण्याची शक्यता आहे. पारनेर विधानसभेला राणी लंकेंना तिकीट मिळेल का..? उभारीवर असलेला ठाकरे गट शांत बसेल का..? ठाकरे गटच तुतारीच्या विरोधात काम करील का..? या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न…

निलेश लंके हे आता मुरब्बी राजकारणी झाले आहेत. दाखवायचं एक आणि करायचं एक, हे त्यांनाही आता कळायला लागलंय. पारनेर मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केला आहे. खरंतर निलेश लंके यांनीच लोकसभेला, विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्याचा शब्द दिल्याचा दावा ठाकरे गटाने केला. ठाकरे गटाच्या फायर ब्रँन्ड नेत्या सुषमा अंधारे यांनीही पारनेरमध्ये आपल्या पक्षाचे शक्तीप्रदर्शन केले. मात्र तरीही लंके शांत राहिले. याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारल्यावर त्यांनी अगदी राजकारणी स्टाईलने उत्तर दिले.

सध्याही निलेश लंके शांत दिसत आहेत. मात्र ही वादळापूर्वीची शांतता असल्याचं काहींचं म्हणणं आहे. ठाकरे गट आक्रमक झाल्याने लंके शांत दिसताहेत. ऐनवेळी ते पवारांकडून आपल्या पत्नीचंच तिकीट घेऊन येतील, असंही काही विश्लेषकांचं म्हणणं आहे. मात्र असं झालं तर आक्रमक झालेला ठाकरे गट खरंच राणी लंकेंचं काम करील का, हा प्रश्न आहे. त्यावेळी बंडखोरी होण्याची शक्यताही आहे. परंतु बंडखोरी झाली तर, मतविभागणीचा फायदा लंकेंच्याच पथ्यावर पडेल, असाही राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

या मतदारसंघात खरी मजा विखे गट किंवा भाजप सक्रिय झाल्यानंतर येणार आहे. यंदाच्या विधानसभेला पारनेर तालुक्यात 1 लाख 78 हजार 753 पुरुष व 1 लाख 67 हजार 214 महिला मतदार आहेत. या तालुक्यात एकूण 3 लाख 45 हजार 970 मतदार आहेत. म्हणजेच साधारणः साडेतीन लाख मतदार पारनेर तालुक्याचा आमदार ठरविणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डाँ. सुजय विखे यांना पारनेर तालुक्यात 92,340 मते मिळाली. निलेश लंके यांना 1 लाख 30 हजार 440 मते मिळाली.

पारनेरचा स्थानिक उमेदवार असूनही, लंके यांना 38,200 मतांची आघाडी मिळाली. गेल्यावेळच्या विधानसभेचा विचार केला, तर निलेश लंके यांना 1 लाख 38 हजार 570 मते मिळाली होती. म्हणजेच मतदार वाढूनही, विधानसभेपेक्षा लोकसभेला निलेश लंके यांना कमी मते मिळाली. विधानसभेपेक्षा लोकसभेला निलेश लंके यांना सुमारे आठ हजार मते कमी पडली. विधानसभेला निलेश लंके यांना 61,7 टक्के मते होती. लोकसभेला हिच टक्केवारी 55 टक्क्यांपर्यंत आली.

याच कमी मतांच्या गोळाबेरजेत, लंके दाम्पत्याच्या पराजयाची गुपिते लपली आहे. लंकेविरोधात योग्य उमेदवार असेल आणि ऐनवेळचे फासे बरोबर पडले तर, लंकेंचाही पराभव शक्य आहे. लंकेंच्या मतांची टक्केवारी गेल्या पाच वर्षांत कमी झाली आहे. गेली विधानसभा व आत्ता झालेल्या लोकसभेत ती दिसली. शिवाय लंके यांच्या महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या, ठाकरे गटानेही या जागेवर दावा ठोकलाय. लोकसभेला जसं लंकेंनी शेवटच्या क्षणाला तिकीट मिळवलं होतं, तसंच तिकीट आपल्या पत्नीला मिळवून दिलं तर ठाकरे गट विरोधात जाण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाकडून तालुकाप्रमुख डाँ. श्रीकांत पठारे इच्छुक आहेत. त्यांनी कामही सुरु केलं आहे. लंके गट व ठाकरे गटातला संघर्ष भविष्यात जास्त प्रखर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडं महायुतीतही भरपूर इच्छुक आहेत. भाजपकडून प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, सुनील थोरात, अजित पवार गटाकडून बाजार समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत गायकवाड, सुजीत झावरे, काशिनाथ दाते अशी मोठी यादी आहे. शिवाय विजय औटी, संदेश कार्ले अशीही अनेक नावे आहेत, जे शेवटच्या क्षणी अचानक समोर येऊ शकतात.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts