Rohit Pawar News : भारतीय निवडणूक आयोग अठराव्या लोकसभेसाठी कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा करू शकते. कोणत्याही क्षणी लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील आणि आचारसंहिता लागू होईल अशी माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळले गेले आहे. अशातच मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोडी झाली आहे.
शरद पवार यांच्या गटातील आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांची अडचण वाढली आहे. कारण की, रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड साखर कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. हा साखर कारखाना ईडीने जप्त केला असल्याची माहिती समोर येत आहे.
ऐन लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच रोहित पवार यांच्या मालकीचा साखर कारखाना ईडीने जप्त केला असल्याने रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा सेटबॅक ठरू शकतो अशा चर्चा सध्या सुरू आहेत. तसेच रोहित पवार यांच्या मालकीच्या साखर कारखान्यावर झालेल्या कारवाईच्या मुद्द्यावर राजकारण तापण्याची शक्यताही नाकारून चालत नाही.
दरम्यान रोहित पवार यांनी ईडीने केलेल्या या कारवाईवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्यावर झालेल्या कारवाईपेक्षा त्यांनी केलेले वक्तव्य अधिक लक्षवेधी ठरले आहे.
काय म्हटलेत रोहित पवार
ईडी कारवाईनंतर पहिल्यांदाच रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हटलेत की, ‘माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का ? पण, झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू, माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत.
तसेच रोहितदादांनी याबाबत पुढे बोलताना या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हे दिसतं असल्याचे विधान केले आहे. म्हणजेच रोहित पवार यांनी ही कारवाई सत्ताधारी पक्षांच्या दबावातून आणि आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून करण्यात आली असल्याचे अप्रत्यक्षरीत्या म्हटले आहे.
हा तर सत्तेचा गैरवापर
रोहित पवार यांनी त्यांच्यावर झालेली ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल असं म्हटलं आहे. तसेच या कारवाईमुळे साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये असे आश्वासन आपल्या कर्मचाऱ्यांना देऊ केले आहे.
पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का ? मात्र, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही. वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई. परंतु मी महादेवाचा भक्त आहे.
अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेव्हा अनेकांचं थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
लोकसभा निवडणुका अवघ्या बोटावर मोजण्या इतक्या दिवसांवर येऊन ठेपली असतानाच ही कारवाई झाली असल्याने या कारवाईवर विरोधकांच्या माध्यमातून शंका उपस्थित केली जात आहे. रोहित पवार यांनी देखील हीच शंका यावेळी उपस्थित केली आहे. तथापि आता या प्रकरणात पुढे काय घडामोड होते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.