Shirdi Loksabha Election : सध्या अहमदनगरसह संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोर्चे बांधणी केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांच्या माध्यमातून आता महाराष्ट्रातील आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत. यामध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातुन महायुतीकडून बीजेपीचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
दुसरीकडे या जागेवरून अजून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. महाविकास आघाडीने मात्र शिर्डीच्या जागेवरून आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे. आघाडीकडून ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला गेली असून या जागेवरून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षाने संधी दिली आहे.
अद्याप या जागेवर महायुतीचा कॅंडिडेट जाहीर झालेला नाही. दुसरीकडे महाविकास आघाडी मधून उमेदवार जाहीर झाला पण उमेदवाराविरोधातील नाराजी आता उघड होऊ लागली आहे. यु बी टी शिवसेना आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या माध्यमातून भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
युबीटी शिवसेना पक्षाचे समन्वयक अशोक गायकवाड यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली अन या उमेदवारीला विरोध केला आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केला आहे. तसेच तूप घोटाळ्यात ते सामील आहेत.
यामुळे पक्षाने अजूनही या उमेदवारीचा फेरविचार केला पाहिजे अशी हाक गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत घातली. तसेच वाकचौरे यांना संधी न देता चळवळीतील कार्यकर्त्यांना संधी दिली गेली पाहिजे अशी ही मागणी त्यांनी यावेळी केली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेतात हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या उत्कर्षा रूपवते यांनी देखील भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यांनी महाविकास आघाडीतून या जागेवर नवीन उमेदवाराला संधी देण्याची गरज नमूद केली आहे.
विशेष बाब म्हणजे वाकचौरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर उत्कर्षा जी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोटो काढून टाकला आहे.तसेच त्यांनी काँग्रेसचे चिन्हही काढले आहे. यामुळे उत्कर्षा रूपवते काँग्रेसचा हात सोडून या जागेवरून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे पाहायला मिळत असून आपण उमेदवारीबाबत सर्व पर्यायांची चाचपणी करणार असे संकेत त्यांनी दिले आहेत.
एकंदरीत शिर्डीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळतोय. महाविकास आघाडीचे बरेच नेते माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना तिकीट दिल्यामुळे नाराज झाले आहेत.
वाकचौरे यांनी मात्र महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकजुटीने काम करतील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात माझ्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. विद्यमान खासदारांना अर्थातच सदाशिव लोखंडे यांना मतदारसंघात कोणी ओळखत नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
तूप घोटाळ्याबाबत बोलताना त्यांनी याबाबत योग्य वेळी सार काही उलगडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एकंदरीत युबीटी शिवसेना पक्षात शिर्डीच्या उमेदवारीवरून नाराजी पाहायला मिळत असून ही नाराजी आता उद्धव ठाकरे कशी दूर करणार, उमेदवारीबाबत ते आपला निर्णय बदलणार का या साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या राहणार आहेत.