Sujay Vikhe News : सध्या अहमदनगर जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय धामधुम पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांनी निवडणूकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे त्यांनी आता प्रचारालाही सुरुवात केली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आणि महायुतीकडून आपले अधिकृत उमेदवार जाहीर झाले आहेत.
या जागेवरून महायुतीकडून विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीकडून पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांना तिकीट मिळालेले आहे. दरम्यान आज आपण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कोणाच्या विजयाची शक्यता अधिक आहे याबाबत राजकीय विश्लेषक काय मत व्यक्त करत आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
सुजय विखे यांचे पारडे जड भरणार
निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश घेतला आहे. त्यांनी हाती तूतारी घेत सुजय विखे पाटील यांना आवाहन दिले आहे. खरे तर लंके हे मूळचे शिवसेनेतील. मात्र शिवसेनेत असतांना पाच वर्षांपूर्वी लंके यांनी पारनेरमध्ये शिवसेनेचे विधानसभा माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी घेतलेल्या शिवसेना मेळाव्यात धुडघूस घडवून आणली, ती सभा उधळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.
त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांची अजित दादा यांच्या समवेत जवळीक वाढली आणि याचा फायदा म्हणून पारनेर मधून ते आमदार बनलेत. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली अजितदादांनी वेगळी भूमिका घेतली आणि सत्तेत सामील झालेत. निलेश लंके यांनी देखील अजितदादा यांच्या समवेत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला.
आता मात्र लंके यांनी वेगळी भूमिका घेत पुन्हा एकदा शरद पवार यांच्या गटात सहभागी होण्याचा आणि नगर दक्षिण मधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत लंके यांना सुजय विखे यांचे मोठे आव्हान राहणार आहे. सुजय विखे यांनी गेली पाच वर्ष आपल्या लोकसभा मतदारसंघात विविध विकास कामे मार्गी लावली आहेत.
बारा वर्षांपासून जो उड्डाणपूल रखला होता तो नगर शहरातील उड्डाणपूल सुजय विखे यांच्या प्रयत्नांमुळे पूर्ण झाला. बायपास रस्त्याचे काम पूर्ण झाले, नगर करमाळा महामार्गाचे काम पूर्ण झाले, आयुष हॉस्पिटलचे काम त्यांनी पूर्ण केले, पाणी योजनांचे काम त्यांनी पूर्ण केले, भूमिगत गटाराचे काम त्यांनी पूर्ण केले. यामुळे या विकास कामांचे भांडवल त्यांच्या कामी येणार आहे.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुजय विखे हे विठ्ठल राव विखे पाटील यांचे पणतू आहेत.
विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. प्रवरा हा सहकारी तत्त्वावर चालणारा आशिया खंडातील पहिला साखर कारखाना त्यांनीच सुरू केला. त्यांनी विविध क्षेत्रात मोलाची कामगिरी केली यामुळे त्यांना नगरचे विकास पुरुष म्हणून ओळखले जात असे.
यामुळे विखे घराण्यासोबत अनेकजण आजही एकनिष्ठ आहेत. परिणामी याचाही सुजय विखे पाटील यांना फायदा होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्यात शिवसेनेत उभी फूट पडली आणि शिवसेनेतील ताकतवर नेते एकनाथ शिंदे भाजपासोबत गेलेत आणि मुख्यमंत्री झालेत.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली राष्ट्रवादी काँग्रेस मधील ताकतवर नेते अजित दादा पवार हे सत्तेत आलेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिन्ही नेते एकत्र आले आहेत आणि महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. साहजिकच याचा देखील फायदा सुजय विखे पाटील यांना होणार आहे.
याशिवाय मोदी ब्रँडचा देखील सुजय विखे पाटील यांना फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सुजय विखे पाटील हे निलेश लंके यांना वरचढ ठरु शकतात असे मत काही राजकीय विश्लेषकांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. तथापि, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके विजय ठरणार की सुजय विखे पाटील पुन्हा एकदा विजय सलामी देणार हे चार जून 2024 ला समजणार आहे.