Sujay Vikhe Patil News : सध्या संपूर्ण राज्यात आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याने सहकार क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. दरम्यान, या जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागांसाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात लोकसभेचे शिर्डी आणि नगर दक्षिण असे दोन मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघांमध्ये आता महायुतीमधून आणि महाविकास आघाडी मधून इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. नगर दक्षिण बाबत बोलायचं झालं तर हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे.
येथून 2019 पूर्वी दिलीप गांधी यांनी खासदारकी भूषवली आहे. तसेच 2019 च्या निवडणुकीत या जागेवरून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विजयश्री मिळवला आहे. शिवाय विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांना पुन्हा एकदा या जागेवरून उमेदवारी मिळणार अशी आशा आहे. उमेदवारीसाठी ते इच्छुक असून त्यांनी मध्यंतरी चणाडाळ वाटप आणि साखर वाटपाच्या माध्यमातून मत पेरणी देखील सुरू केली होती.
या जागेसाठी ते अजूनही शर्यतीत आहेत. या जागेवर त्यांचा दावा प्रबळ आहे. परंतु भाजपामध्ये नेहमीच अनपेक्षित घडत असते.हे आपल्याला भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीवरून समजलेच असेल. भाजपाचे केंद्रीय नेतृत्व केव्हा कोणाला संधी देईल हे काही सांगता येत नाही. यामुळे डॉक्टर सुजय विखे यांची उमेदवारी देखील अजूनही अधांतरीच भासत आहे. विशेष म्हणजे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीला त्यांच्या पक्षातूनच आता विरोध होत आहे. स्वपक्षीय आमदार राम शिंदे यांनी या जागेवरून भाजपाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. एवढेच नाही तर महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या अजितदादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी देखील या जागेवरून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
निलेश लंके यांच्या धर्मपत्नी सौ राणी लंके यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी नगर दक्षिणमधून लोकसभा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. यासाठी त्यांनी शिवस्वराज्य यात्रा देखील काढली होती. विशेष म्हणजे आमदार निलेश लंके यांच्या प्रतिष्ठानने शिवपुत्र संभाजी हे महानाट्य देखील नगर शहरात आयोजित केले होते. या महानाट्याच्या आडून निलेश लंके यांनी लोकसभेसाठी ग्राउंड तयार करण्यास सुरुवात केली असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहेत. विखे आणि लंके यांच्यातील राजकीय संघर्ष हा सर्वश्रुत आहे. खरेतर जिल्ह्यात नेहमीच विखे विरुद्ध सारे असे चित्र तयार होते.
ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात अहमदनगर जिल्ह्याचे सूत्र होते त्यावेळी देखील असेच चित्र पाहायला मिळत असे. मध्यंतरी विखे कुटुंबाने शिवबंधन बांधले होते, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, त्यावेळी देखील अशी परिस्थिती पाहायला मिळाली होती. आता विखे कुटुंबीय 2019 पासून भाजपमध्ये आहेत. विशेष म्हणजे आता देखील नगर जिल्ह्यात विखे विरुद्ध सारे अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. पण, यावेळी विखे विरोधकांमध्ये स्वपक्षीयांचा देखील समावेश आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणूक विखे कुटुंबीयांसाठी अधिक आव्हानात्मक होणार हे स्पष्ट होत आहे.
विखे विरोधकांनी दिले निलेश लंके यांना बळ
सध्या स्थितीला अहमदनगर जिल्ह्यात इतिहासाची पुनरावृत्ती होत असून विखे विरुद्ध सारे असे चित्र पाहायला मिळत आहे. फरक फक्त एवढाच आहे की, सध्या विखे यांच्या स्वपक्षातील नेत्यांनी देखील त्यांच्याविरुद्ध राजकीय लढाई सुरू केली आहे. भाजपाच्या काही नेत्यांच्या माध्यमातून महायुती मध्ये समाविष्ट असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश लंके यांना पाठबळ दिले जात आहे. भाजपचे विधान परिषद आमदार राम शिंदे आणि भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विखे विरोधी भूमिका घेतली आहे. यासाठी त्यांनी अप्रत्यक्षरीत्या निलेश लंके यांना पाठबळ देण्यास सुरुवात केली आहे.
यासाठी हे दोन्ही नेते वारंवार निलेश लंके यांच्या व्यासपीठावर हजेरी देखील लावत आहेत. मध्यंतरी विवेक कोल्हे यांनी दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाला निलेश लंके यांच्या समवेत व्यासपीठ शेअर केले होते. विशेष म्हणजे महानाट्याला देखील निलेश लंके यांच्या व्यासपीठावर कोल्हे यांनी हजेरी लावली. विधान परिषद आमदार राम शिंदे यांनी देखील शिवपुत्र संभाजी या महानाट्याला निलेश लंके यांच्या व्यासपीठावर हजेरी लावत त्यांची प्रशंसा केली आहे. एकंदरीत भाजपाच्या या नेत्यांच्या माध्यमातून निलेश लंके यांना लोकसभेसाठी पाठबळ दिले जात आहे.
विखे नेहमीच मार्ग काढतात
संपूर्ण देशात भाजपाची यंत्रणा इतर विरोधकांना वरचढ ठरत आहे. तसेच विखे यांची यंत्रणादेखील नगर जिल्ह्यात इतर साऱ्यांना उरून पुरत आहे. विखे विरुद्ध सारे असे चित्र नेहमीच पाहायला मिळते आणि यामध्ये विखे यांची नेहमीच सरशी होत असते. मात्र आगामी लोकसभेत देखील विखे यांचा पॅटर्न चालणार का हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे. खरेतर 2019 मध्ये विखे पिता-पुत्रांनी भाजपामध्ये प्रवेश केला. विखे कुटुंबीय भाजपवासी झाले.
मात्र याचा फटका भाजपाला बसला. विखे यांची भाजपात इंट्री झाली आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील अनेक विधानसभेवर भाजपाला पराभव पत्करावा लागला. यामुळे भाजपाशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांमध्ये विखे यांच्या विरोधातील नाराजी वाढली. यामुळे पराभव झालेल्या उमेदवारांनी याची तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मात्र घडले सारे विपरीत. तक्रारीनंतर पक्षात विखे यांचे वजन आणखी वाढले.
दिल्ली दरबारी विखे यांचे विशेष वजन आहे. भाजपाचे केंद्रीय नेतृत्व त्यांच्याकडे राज्यातील प्रमुख मराठा नेतृत्व म्हणून पाहत आहे. यामुळे त्यांना सहजतेने दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबत भेटी मिळत आहेत. हेच कारण आहे की, आगामी लोकसभेत देखील विखे यांचे पारडे थोडेसे वजनदार आहे. तथापि, विखे आपल्या पक्षातील नेत्यांचा विरोध मोडून उमेदवारी खेचून आणतात का हे पाहणे विशेष खास राहणार आहे.