पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि वाहतूक कोंडीची जी काही बऱ्याच दिवसापासूनची समस्या आहे त्यापासून सुटका मिळावी याकरिता रिंगरोडचे काम हाती घेण्यात आलेले आहे. पूर्व आणि पश्चिम असे या रिंग रोडचे दोन भाग करण्यात आलेले असून त्यातील पश्चिम भागाचे फेरमूल्यांकन पूर्ण झाले असून आता त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जमिनीसाठीची संमतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याकरिता संमती पत्र देखील मागवली जात आहेत. पश्चिम विभागातील 35 गावांमधील 2455 गटातील जमीन याकरिता संपादित केली जाणार आहे.
या रिंगरोडसाठी जमीन देण्यास 12000
शेतकऱ्यांनी दिली संमतीयाबाबत सविस्तर वृत्त असे की या रिंगरोड साठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाकरिता 12000 शेतकऱ्यांनी जमीन देण्याला तयारी दर्शवली असून त्यातील 85 हेक्टर जागेचे भूसंपादन देखील पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांनी पुढील काही दिवसांमध्ये संमती दिलेली आहे अशा शेतकऱ्यांचे निवाडे जाहीर करण्यात येऊन लागणारी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. आतापर्यंत जी काही 85 हेक्टर जमीन संपादित करण्यात आलेली आहे त्याकरिता जिल्हा प्रशासनाने 491 कोटी रुपयांचा मोबदला देखील दिला आहे.
यातील पश्चिम भागातील रिंग रोडच्या जमिनीचे फेरमुल्यांकन करण्यात आले असून संमतीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली होती व त्याकरिता संमती पत्र देण्यासाठीची अंतिम मुदत 21 ऑगस्ट होती. या अंतिम मुदतीपर्यंत मावळ, हवेली, भोर आणि मुळशी तालुक्यातील 35 गावातील 16 हजार 940 जमीन धारक असून त्यांच्या नावावर एकूण 738.64 हेक्टर जमीन आहे. या 16000 पैकी 12,166 शेतकऱ्यांनी जमीन देण्यास संमती दिल्यामुळे आता या प्रकल्पाकरिता आवश्यक जमीन संपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
जर आपण या चारही तालुक्यातील 35 गावांचा विचार केला तर या प्रकल्पाकरिता 2455 गटातील जमीन संपादित केली जाणार असून त्यापैकी 1775 गटातील जमिनीसाठी संमती मिळाली आहे. 491 हेक्टर क्षेत्र रिंग रोडला देण्यास शेतकऱ्यांनी संमती दिली असून अजून देखील 2006 हेक्टर एवढे क्षेत्र संपादित करणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आतापर्यंतच्या 84 हेक्टर एवढी जमीन संपादना पोटी 491 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती देखील जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून समोर आली आहे. या 491 कोटी रुपये वाटपात सर्वाधिक मावळ तालुक्याला मोबदला मिळाला असून तो 218 कोटी 61 लाख रुपये इतका आहे.
31 ऑगस्ट पर्यंत निवाडे निश्चित करण्याची प्रक्रिया
मावळ, मुळशी, हवेली आणि भोर या तालुक्यात संमती दिलेल्या क्षेत्रातील जी काही जमीन संपादित करण्यात आलेली आहे ती वगळता बाकीच्या जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया बाकी आहे. एकूण 491.742 हेक्टर क्षेत्राच्या संपादनासाठी शेतकऱ्यांकडून संमती मिळाली आहे परंतु आतापर्यंत 84 हेक्टर क्षेत्राचे संपादन करण्यात आलेले आहे. उरलेल्या 407 हेक्टर जमिनीचे 31 ऑगस्टपर्यंत निवडून निश्चित करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.