शिक्षण ही अशी गोष्ट आहे की ती तुमच्या सर्वस्वी इच्छाशक्तीवर अवलंबून असते. म्हणजेच तुम्ही शहरी भागात राहता की ग्रामीण भागात याला महत्व नाही परंतु तुम्ही आहात त्या ठिकाणी तुम्हाला मिळत असलेल्या शिक्षणाच्या सुविधा, तुमची किंवा तुमच्या परिसरात असलेली शिक्षणाबाबतचे आस्था इत्यादी बाबी खूप महत्त्वपूर्ण असतात. गेल्या काही वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणावर घवघवीत यश मिळताना दिसून येत आहे.
यामागे त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा या नक्की शहरी भागातील मुलांच्या तुलनेमध्ये कमी असतात परंतु अफाट इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थी
देखील आता खूप मोठ्या प्रमाणावर पुढे गेले आहेत. याच मुद्द्याला धरून आपण पाहिले तर महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असे एक गाव आहे या गावाला अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते.पैठण तालुक्यातील सानपवाडी आहे अधिकाऱ्यांचे गाव
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात सानपवाडी नावाचे एक गाव असून या गावाची ओळख म्हणजे या ठिकाणचे नागरिक मोठ्या प्रमाणावर सरकारी नोकऱ्यांमध्ये आहेत.या गावाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 75 घरांची वस्ती असलेले हे गाव आहे परंतु तब्बल 50 पेक्षा जास्त मुले वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये आहेत. चारशे लोकसंख्या असलेल्या या गावाचे हे वेगळेच वैशिष्ट्य आहे.
जर आपण या गावातील सरकारी नोकऱ्यांमधील असलेल्या मुलांचा विचार केला तर तब्बल एक जण उपविभागीय अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच पोलीस निरीक्षक, 23 जण पोलीस कर्मचारी तर पाच शिक्षक तर सहा जण भारतीय सैन्य दलात आहेत. तसेच या व्यतिरिक्त पाच अभियंते आणि सहा डॉक्टर देखील आहेत.
या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे सानपवाडीला अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. अनेक वर्षापासून या गावात अधिकारी होण्याची परंपरा चालत आली असून विशेष म्हणजे मुलगा आणि मुलगी असा भेद हा शिक्षणाच्या बाबतीत या ठिकाणी केला जात नाही.
शिक्षणामध्ये प्रगती करण्यामागील या गावाची काही कारणे
या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा मुलगा किंवा मुलगी प्राथमिक शिक्षण घेते तेव्हाच त्यांना स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. याकरिता शाळेपासूनच त्यांना विविध प्रकारचे अभ्यासक्रम किंवा उपक्रम राबवले जातात जसे की प्रश्नमंजुषा सारख्या स्पर्धा देखील घेतल्या जातात. अशा स्पर्धा या तालुका आणि जिल्हास्तरावर देखील राबवल्या जातात. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांची जी मनस्थिती पाहिजे ती अगदी लहानपणापासून शिक्षकांच्या माध्यमातून तयार केली जाते.
त्यामुळे असे विद्यार्थी मोठे होऊन शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन दाखवतात. तसेच गावातील इतर अधिकाऱ्यांकडून देखील प्रेरणा घेतली जाते व त्या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी कष्ट घेतात. अशा पद्धतीने या गावाने अधिकाऱ्यांचे गाव ही बिरुदावली धारण केली आहे.