Exclusive

ब्लॉग घेतोय बळीराजाच्या भावनेचा बळी! शेतकऱ्यांना दिशाभूल करून ब्लॉगर वेबसाईटवरून कमवताय लाखों; खरी किंवा खोटी बातमी ओळखायची कशी?

Agriculture News : आपण मोठ्या गर्वाने जय जवान, जय किसान म्हणत असतो. ज्या जवानांमुळे आपण देशात सुरक्षित वावरतोय आणि ज्या शेतकऱ्यांमुळे, ज्या बळीराजामुळे आपण पोटभर जेवण करतोय त्यांच्या कर्जातून उतराई होण्यासाठी त्यांचा जय-जयकार आपण करतो. मात्र खरंच जवानांची आणि शेतकऱ्यांची जय व्हावी अशी आपली इच्छा आहे का? आता हा प्रश्न का उपस्थित होतोय? तर आपण ज्या शेतकऱ्यांचा जय-जयकार करतो त्या भोळ्या-भाबड्या शेतकऱ्याची या डिजिटल मीडियामध्ये सर्रास दिशाभूल केली जात आहे. त्यांची या माहिती तंत्रज्ञानाने परिपूर्ण जगतात सर्रास फसवणूक केली जात आहे.

आता तुम्ही म्हणणार हे कसं. खरं पाहता, गेल्या काही वर्षांत लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत, शेतमजुरांपासून शेतकऱ्यांपर्यंत, शहरांपासून ते खेड्यापर्यंत सर्वत्र मोबाईलचा वावर वाढला आहे. आता सर्व लोकांकडे मोबाईल आहे. एकदा आपण जेवणाकडे दुर्लक्ष करू मात्र मोबाईल मध्ये येणाऱ्या नोटिफिकेशन कडे आपलं दुर्लक्ष होत नाही. विशेषता या कोरोना काळापासून मोबाईलचा वापर सर्वत्र वाढला आहे. शेतकरी बांधव देखील आता चांगल्या पद्धतीने मोबाईलचा वापर करू लागले आहेत. त्यांना मोबाईलमुळे या आधुनिक जगात काय सुरू आहे याची कल्पना आता येऊ लागली आहे.

मोबाईलमुळे अगदी अमेरिकेत काय घडतंय ते शेतकऱ्यांना त्यांच्या स्क्रीनवर दिसू लागल आहे. अमेरिकेत कोणत पीक घेतलं जातं, इजराइल मध्ये कशा पद्धतीने शेतीची तंत्रज्ञाने विकसित झाली आहेत, आपल्याकडील शास्त्रज्ञ शेतीसाठी काय संशोधन करत आहेत, मान्सून कसा राहणार आहे, बाजारात शेतमालाला काय भाव मिळत आहे, कृषी शास्त्रज्ञांनी दिलेला कृषी सल्ला, सरकारने शेतकऱ्यांसाठी काढलेल्या योजना, जनावरांना होणारे रोग त्यांवरील उपचार इत्यादी माहिती मोबाईलवर केवळ एका क्लिकच्या मदतीने शेतकऱ्यांना मिळू लागली आहे.

आता हा झाला फायद्याचा भाग. मात्र या मोबाईलमुळे शेतकऱ्यांची दिशाभूल देखील सर्रासपणे सुरू आहे. हो! पण ही दिशाभूल मोबाईलमुळे नाही तर मोबाईलवर चुकीची माहिती सर्रासपणे प्रसारित करणाऱ्या लोकांमुळे होत आहे. आता तुम्ही म्हणाल ते कसं? तर ते होतेय ब्लॉगिंगमुळे. आता असे अनेक मराठी ब्लॉग लोकांनी बनवले आहेत, ज्यात केवळ शेतकऱ्यांना टार्गेट केलं जात आहे. म्हणजेच शेतीविषयक ब्लॉग बनवण्यात आले आहेत. खरं पाहता, शेतकऱ्यांसाठी ब्लॉग तयार केलेत म्हणून अशा लोकांचे कौतुक केले पाहिजे.

मात्र हा ब्लॉग शेतकऱ्यांसाठी नव्हे तर शेतकऱ्यांची दिशाभूल करून आपली रोजी-रोटी चालवण्यासाठी सुरू करण्यात आलेला ब्लॉग आहे. हो, कदाचित अनेक जाणकार यात भिन्न मत ठेवत असतील. कारण की सर्वच ब्लॉगर तसे नाहीत. पण बहुतांशी, जवळपास 90% हून अधिक ब्लॉगर आपल्या ब्लॉगवर दिशाभूल करणारे आर्टिकल पब्लिश करत आहेत. आणि हे आर्टिकल व्हाट्सअप वर शेअर करतात. व्हाट्सअप वर वेगवेगळे ग्रुप बनवले जातात. या ग्रुपमध्ये प्रामुख्याने शेतकरीच असतात.

यात शासकीय योजनेची चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे. जसें की, या शेतकऱ्यांना मिळणार सौर कृषी पंप, या शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर मिळणार ठिबक, या शेतकऱ्यांना होणार गाई-म्हशीचे वाटप, ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज केला का? इत्यादी आकर्षक मथळ्याखाली आर्टिकल लिहिले जातात. याची ही लिंक व्हाट्सअप ग्रुपवर शेअर होते आणि शेतकऱ्यांना वाचण्यास एक प्रकारे भाग पाडले जाते. खरं पाहता या शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना होणे जरुरीचेच आहे. मात्र या अशा आकर्षित करणाऱ्या मथळ्याच्या खाली हे ब्लॉगर लोक भलतीच माहिती देतात.

अनेक प्रसंगी शासनाची कोणतीच योजना अस्तित्वात नसते तरीदेखील हे ब्लॉगर लोक शासनाची अमुक योजना सुरू झाली असं म्हणून भलतीच माहिती देतात, जें की एक मोठ फसवणुकीचे काम आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीच साध्य होत नाही याउलट त्यांचा बहुमूल्य वेळ वाया जातो. तसेच, ज्या वेबसाईटवर किंवा ब्लॉगवर योग्य माहिती असते त्या ठिकाणी देखील मग शेतकरी जात नाहीत.

म्हणजेच चुकीच्या माहितीमुळे अनेकदा कामाची माहिती शेतकऱ्यांकडून गहाळ होते. यामुळे या अशा ब्लॉगमुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. ब्लॉगवर गूगलच्या एडवर्टाइजमेंट पार्टनर कंपनीकडून ऍडव्हर्टाईस दाखवली जाते आणि त्याच्या मोबदल्यात ब्लॉग चालवणाऱ्याला चांगला पैसा मिळतो. मात्र या पैशांसाठी भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांची दिशाभूल करणे कितपत योग्य आहे? हा प्रश्न या लोकांनी स्वतःला विचारणे अपेक्षित आहे.

जर याच ब्लॉगवर अशा लोकांनी शेतकरी हिताची माहिती जरी त्यावर कमी क्लिक आले, ते कमी व्हायरल झाले तरी शेतकऱ्यांना फायदेशीर अशी माहिती मिळेल आणि आपण ज्याच्या जीवावर खातोय त्या बळीराजाचा खरंच जय या निमित्ताने होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य माहिती आपल्या ब्लॉगवर या लोकांनी टाकली तर शेतकरी अपडेटेड राहतील, याचा शेतकऱ्यांनाही फायदा होईल आणि मराठी ब्लॉगिंगचे क्षेत्र आपलं एक वेगळं स्थान प्रस्थापित करू शकत.

ब्लॉगवर असलेली माहिती/बातमी खरी की खोटी कशी ओळखणार?

एखादी बातमी किंवा माहिती ही खरी आहे की नाही हे पडताळण्यासाठी काही मार्ग आहेत. सर्वात आधी आपण ज्या वेबसाईटवर किंवा ब्लॉगवर माहिती वाचत आहात तो विश्वासार्ह ब्लॉग आहे का? याची खात्री करा. तसेच याआधी अशी माहिती, बातमी आपण इतर मोठ्या माध्यमांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये, वेबसाईट मध्ये, न्युज चॅनेलवर वाचली आहे, ऐकली आहे कां? हे चेक करा. अशा बातमीमध्ये काही पुरावे, संदर्भ दिले आहेत का? हे चेक करू शकता. अशा पद्धतीने आपण योग्य किंवा अयोग्य बातमी ओळखू शकता. मात्र अलीकडे ह्या अशा बनावट बातम्या ओळखणे देखील अवघड झाले आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts