Ahmednagar Politics News : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे जिल्ह्यात वारे जोरात वाहत असून, त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी सुरु केली आहे. लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी देखील अनेकांनी आताच स्वयंघोषणा केल्या आहेत. दरम्यान सध्या अहमदनगर जिल्ह्यात भाजप काय राजकीय चाल खेळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या लोकसभेची अहमदनगर अर्थात दक्षिणेची जागा भाजपकडे आहे. तेथे खा. सुजय विखे हे खासदार आहेत. तेथेही भाजप नेमका कोणता उमेदवार देईल याबाबत चर्चा सुरु आहेत. दरम्यान आता निवडणुकीच्या आखाड्यात भाजप सध्या हभप भास्करगिरी महाराज यांना उतरवणार असल्याच्या चर्चा आहेत. परंतु त्यांना नेमके लोकसभेला दक्षिणेत उतरवणार की नेवाशात आमदारकीला उतरवणार याबाबत नागरिकांत चर्चा सुरु आहेत.
पर्याय एक – दक्षिणेत खा. सुजय विखेंऐवजी हभप भास्करगिरी महाराज ?
अहमदनगर लोकसभा मतदार संघात खा. सुजय विखे हे स्टँडिंग खासदार आहेत. ही जागा महायुतीच्या जागावाटपात भाजपकडे येईल असे म्हटले जाते. सध्या या जागेवर हभप भास्करगिरी महाराज याना उभे केले जाईल अशी चर्चा सध्या रंगली आहे. भाजपची वोट बँक, तसेच वैयक्तिक महाराजांचा भक्त परिवार देखील मोठा आहे त्यामुळे याचा चांगला फायदा होऊ शकतो त्यामुळे दक्षिणेत खा. सुजय विखेंऐवजी हभप भास्करगिरी महाराज उभे राहतील अशी चर्चा सध्या रंगली आहे.
पर्याय दोन – नेवाशात आ. गडाख यांच्या विरोधात हभप भास्करगिरी महाराज ?
जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघातून देवगड संस्थानचे सर्वेसर्वा, विश्व हिंदू परिषदेचे हभप भास्करगिरी महाराज यांना उमेदवारी देण्याचे घाटत आहे. त्यादृष्टीने प्राथमिक हालचालीही झाल्याचे पुढे येत आहे. हभप भास्करगिरी महाराज यांची जनमानसात असलेल्या प्रतिमेचा पुरेपूर वापर व्हावा, यासाठी त्यांनाच उमेदवारी देण्याचा सूर आळवला जात आहे. भाजपच्या नेत्यांशी हभप भास्करगिरी महाराज यांचे सलोख्याचे संबंध आहेत, मतदारसंघासह जिल्ह्यातील घराघरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अतिशय कडक शिस्तीचे असलेले हभप भास्करगिरी महाराज यांच्या रुपाने भाजपकडे आ. शंकरराव गडाख यांच्या विरोधात सक्षम उमेदवार आहे. मात्र, हभप भास्करगिरी महाराज यांच्या होकाराकडे वरिष्ठ नेतेमंडळींचे लक्ष लागले आहे अशी चर्चा आहे.
श्रीरामपुरात सरसंघचालक मोहन भागवतांचाही होता मुक्काम
श्रीरामपूर येथे सरला बेटावर सरसंघचालक मोहन भागवतांचा नुकताच मुक्काम झाल्याची माहिती समजली आहे. तसा हा मुक्काम संघाच्या कार्यासाठी होता, परंतु यावेळी त्यांची हभप भास्करगिरी महाराज यांच्याशी काही राजकीय चर्चा झाली असावी अशी देखील नागरिकांत चर्चा आहे.