Ahmednagar Politics :- अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार व्यूहरचना आखताना दिसत आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार) गटासाठी महाराष्ट्रातील अहमदनगर मतदारसंघ महत्वाचा ठरणारा आहे.
दरम्यान आज (गुरुवार) मुंबईत नगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी बाबत राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांची आढावा बैठक झाली. यावेळी सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, आदींसह नेते उपस्थित होते.
यावेळी रोहित पवार यांचे नाव आघाडीवर होते. विखे यांच्या विरोधात रोहित पवार अशी लढत करण्याचा विचार राष्ट्रवादीचा होता. परंतु यावेळी काहींनी आ. लंके यांचे नाव समोर आणले.
यावेळी जर पुढील दोन दिवसात आ.लंके हे जाहीरपणे शरद पवार गटात आले तर त्यांना नगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी देऊ असं यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. आता या जयंत पाटील यांनी दिलेल्या खुल्या ऑफरमुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील राष्ट्रवादी भवनात ही बैठक पार पडली. या बैठकीला दिंडोरी, नगर, हिंगोली, वर्धा, अमरावती, बीड, भिवंडी आणि जालना लोकसभा मतदार संघ आदींचा आढावा घेतला गेला.
आ. लंके यांची काय भूमिका ?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यावर आमदार लंके यांनी सुरवातीला आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली होती. त्यानंतर मात्र ते अजित पवार गटात गेले. नुकतेच अजित पवार पारनेरमध्ये येऊन गेले.
परंतु लंके जरी अजित पवार यांसोबत असले तरी आ. लंके हे शरद पवारांवर तितकंच प्रेम करतात हे देखील तितकंच खरं आहे. कारण अजित पवार दौऱ्यावेळी लंके यांनी अजित दादांसोबत शरद पवार व सुप्रिया सुळे यांचेही फोटो वापरले होते.
तसेच एका वृत्तपत्राने नुकतीच त्यांची मुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी शरद पवारांच्यात मी देव पाहिला असे लंके म्हणाले होते. यामुळे आता जयंत पाटील यांनी दिलेल्या ऑफरमुळे जिल्ह्यात राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
आमदार लंके हे अजित पवार यांना सोडणार नाही हे सत्य असलं तरी बदलती परिस्थिती व शरद पवारांवरील प्रेम पाहता ते जर लोकसभेसाठी शरद पवार गटात गेलेच तर आश्चर्य वाटायला नको.