Ahmednagar Politics : सध्या आगामी लोकसभा त्यानंतर होणाऱ्या विधानसभा आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यात लोकसभेच्या शिर्डी आणि नगर दक्षिण अशा दोन जागा आहेत. दरम्यान या दोन्ही जागांसाठी महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये लोकसभा लढवू इच्छिणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे.
अनेकांची मनातील इच्छा आता ओठांवर आली आहे. प्रामुख्याने नगर दक्षिणची निवडणूक यंदा विशेष रोमांचक होण्याची शक्यता आहे. कारण की या जागेसाठी इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. सध्या नगर दक्षिण मधून डॉक्टर सुजय विखे हे खासदार म्हणून कामकाज पाहत आहेत. विशेष म्हणजे ही जागा महायुतीकडून भाजपाच्या वाटेला जाईल आणि भाजपा मधून पुन्हा एकदा डॉक्टर सुजय विखे यांनाच तिकीट मिळणार असे काही जाणकारांच्या माध्यमातून सांगितले जात आहे.
मात्र, डॉक्टर सुजय विखे यांच्यासाठी या जागेवरून पुन्हा भाजपाकडून उमेदवारी मिळवणे खूपच आव्हानात्मक होणार आहे. कारण की, या जागेसाठी त्यांच्याच पक्षातून त्यांना आव्हान मिळत आहे. या जागेवरून भाजपाचे विधान परिषद आमदार राम शिंदे यांनी देखील निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार यांचा गट) कडून पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी देखील या जागेवरून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
दुसरीकडे डॉक्टर सुजय विखे यांनी पक्षाकडून मला तिकीट मिळाल्यानंतर मी आमदार निलेश लंके असो किंवा आमदार राम शिंदे यांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटातील आमदार संग्राम जगताप यांनी या जागेवरून लोकसभा लढवणार की नाही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
खरे तर काल त्यांच्या पक्षाची नगर शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी उपमहौपार गणेश भोसले, माजी शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, कुमारसिंह वाकळे, केतन क्षीरसागर, अभिजित खोसे, संजय सपकाळ, वैभव ढाकणे, उबेद शेख इत्यादी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रदेश पातळीवर काम करून नगरमधून राज्याचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी लोकसभा लढवणार की नाही याबाबत आपली भूमिका जाहीर केली.
आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की, “मी लोकसभेचा उमेदवार नाही. पण पक्षाचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेत काम करत राहणार आहे. विधानसभाच लढणार असल्याचे त्यांना सांगितले”. यावेळी आमदार जगताप यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या देखील दिल्या आहेत. ते म्हटलेत की, पद घेऊन घरात बसू नका. घराबाहेर पडा. संघटनेत काम करताना टीका होणारच.
घराबाहेर पडल्यानंतर कुत्रे भुंकणारच. त्याकडे दुर्लक्ष करा. मी त्यांच्यासाठी समर्थ आहे. गेल्या 10 ते 12 वर्षात मी सर्व काही अनुभवले आहे. त्यामुळे चिंता करू नका. कार्यकर्त्यांनी फक्त संघटनेच्या माध्यमातून काम करत राहावे. आपली नगरची संघटना राज्यात एक नंबरची बनली पाहिजे असे सुद्धा म्हटले आहे. यामुळे सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाने या जागेवरचा दावा सोडला का ? अशा चर्चा रंगल्या आहेत.
हे पण वाचा : शिर्डी लोकसभेसाठी महायुतीकडून कोण ; गद्दारीचा शिक्का बसलेले सदाशिव लोखंडे यांचा पत्ता कट होणार ?