Ahmednagar Politics :- सध्या अहमदनगर लोकसभेची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपचे खासदार सुजय विखे यांच्या विरोधात नेमके कोण उभे राहणार याबाबत चर्चा सुरु आहेत. ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांच्याकडून कोण उभे राहणार याबाबत चर्चा सुरु आहे.
दरम्यान याबाबत लंके, तनपुरे, रोहित पवार आदी नावे समोर येत आहेत. नुकत्याच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत आमदार रोहित पवार यांचे नाव लोकसभेसाठी पुढे आल्याचे समजते. याच विषयावर जेव्हा सुजय विखे पाटील यांना विचारलं असता, त्यांनी मिश्किलपणे टोला लगावला आहे.
रोहित पवार यांना विचारून चर्चा करतो..
रोहित पायावर यांविषयी बोलताना खा. सुजय विखे म्हणाले, रोहित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. मी चर्चेवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. लोकसभा निवडणूक लढवणार की नाही, त्यांच्या मनात काय चालले आहे, हे पाहणार आहे.
त्यानुसार तयारी केली जाईल. ते निवडणूक लढवणार असतील तर मला अधिक तयारी करावी लागेल.आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. खरं तर हा मिश्किल टोला होता. परंतु अनेकांनी याचे विविध अर्थ काढायला सुरवात केली व चर्चाना उधाण आले.
आ. लंके व आ. शिंदे यांच्या भेटीवर वक्तव्य
आ. लंके व आ. शिंदे यांच्या भेटीवर बोलताना ते म्हणाले की, या दोघांचा दौरा मला टीव्हीच्या माध्यमातून बघायला मिळाला. महायुती किती मजबूत आहे हे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने टीव्हीच्या माध्यमातून पाहिले आहे.
आज नगर जिल्ह्यात महायुतीला यश आले आहे आणि म्हणूनच अजितदादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय योग्य होता आणि मोहटा देवीच्या पावन भूमीत या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी झाली हे पाहून आनंद झाला.
त्यामुळे आता मला पूर्णपणे खात्री आहे, की भारतीय जनता पक्षाचा लोकसभेचा उमेदवार हा आता तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून यायचा तो आता अधीक जास्त मताने निवडून येईल.