Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द येथील ‘बाप’ कंपनीला कोणत्याही शैक्षणिक संस्थेची अथवा विद्यापीठाची मान्यता नाही. कंपनी विद्यार्थ्यांना ३ वर्षानंतर संगणक पदवी व नोकरी देण्याचा दावा करते.
नोकरीचे आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या मुलांना व पालकांना लाखो रुपयांना गंडा घालत असल्याची तक्रार या कंपनीतील व्यवस्थापनाचे काम पाहिलेले माजी कर्मचारी सुधीर ब्रह्मे यांनी पोलिसात केली.
तक्रारीत म्हटले आहे, कंपनीच्या मान्यतेची चौकशी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कंपनीतून काढले जाते. शेतकऱ्यांच्या मुलांनाच येथे प्रवेश असल्याचा प्रचार केला जातो. पालकांचा सात-बारा उतारा पाहून प्रवेश दिला जातो. आर्थिक पत पाहिली जाते.
प्रवेशासाठी ३ वर्षांचे ३ लाख रुपये आकारले जातात. मोठ्या शहरातील असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या ३ पटीने ‘बाप’ कंपनी फी आकारते. कंपनीत तज्ञ शिक्षकांची नेमणूक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन होत नाही.
शिक्षकांचे लेक्चर होत नाही. विद्यार्थ्यांना ऑनलाईन लेक्चर्स दाखवले जातात. दक्षिणेतल्या मुक्त विद्यापीठाची डिग्री देण्याचे आश्वासन कंपनी देते. विद्यापीठाने विद्यार्थी मिळवून देण्यासाठी आम्ही कोणत्याही संस्थेला नेमले नसल्याचे स्पष्ट केल्याचे ब्रह्मे यांनी तक्रारीत म्हटले.
सन २००९ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीची कोणतीही धोरणे नाही. व्यवस्थापनाकडे मी विद्यार्थ्यांच्या तक्रारी घेऊन जात असल्याने माझा मानसिक छळ करू लागले, म्हणून मी राजीनामा दिला.
विद्यार्थ्यांना परीक्षा देताना सर्रास कॉपी करण्यास मदत केली जाते. ‘बाप’ने वेबसाईटवर जाहीर केलेला अभ्यासक्रम अधिकृत नाही. विद्यापीठ व कंपनीच्या अभ्यासक्रमात तफावत आहे.
यामुळे विद्यार्थी पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाही. ते नापास झाल्यास त्यांचे भवितव्य धोक्यात येईल, असेही ब्रम्हे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
डिग्री कुठून मिळवायची तो विद्यार्थ्यांचा प्रश्न – रावसाहेब घुगे
पारेगाव खुर्द येथे सर्व सोयीने सुसज्ज असलेली ‘बाप’ ही आयटी कंपनी आम्ही चालवतो. आमची शिक्षण संस्था नाही. आमचा कॉलेजचा अथवा कोणत्याही विद्यापीठाचा काहीही संबंध नाही.
आम्ही मुलांना आयटी प्रोजेक्ट् सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी ट्रेन करतो. हेच काम पुण्यामध्ये इन्फोसीस, एलएनटी, विप्रो करते. डिग्री कुठून मिळवायची तो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे.त्या संदर्भात आम्ही मार्गदर्शन करतो.
आमच्या कंपनीत प्रशिक्षित विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून त्यास खात्रीने जॉब देतो. संबंधित आरोप करणारे सुधीर ब्रम्हे आमच्या संस्थेत कार्यरत होते.
त्यांनी केलेले आरोप धादांत खोटे आहे. ते नियमबाह्य बोनसची मागणी करत होते, अशी प्रतिक्रिया ‘बाप’ या संस्थेचे प्रमुख रावसाहेब घुगे यांनी व्यक्त केली.