Ahmednagar News : माजी पालकमंत्री व तत्कालीन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या सचिवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज राधाकृष्ण कोकाटे (भिस्तबाग चौक, सावेडी, नगर) असे या सचिवाचे नाव आहे.
तलाठ्याची नोकरी लावून देतो असे सांगत त्याने २०१६ मध्ये मुंबईतील युवकाची ५ लाख रुपयांची फसवणूक केली होती. सुमित बबन डबे (रा. सायन, बृहन्मुंबई) असे फिर्यादीचे नाव असून माटुंगा पोलिस ठाण्यात मनोज विरोधात गुन्हा दाखल झालाय.
अधिक माहिती अशी : डबे हे एक व्यावसायिक असून ते लहान मुलांचे कपडे विकत असतात. एकदा पुण्यात कोकाटेसोबत त्यांची ओळख झाली. त्याने त्यांना माझ्या साहेबांना सांगून तुला तलाठ्याची नोकरी मिळवून देतो असे सांगितले.
तसेच त्यासाठी ५ लाख रुपयांची डिमांड केली. डबे यांनी त्याला त्यांच्या म्हणण्यानुसार एप्रिल २०१६ मध्ये धनादेश व रोकडमध्ये ५ लाख रुपये दिले होते. परंतु या घटनेला सहा महिने झाले तरी नोकरी लागेना हे लक्षात आल्यावर डबे यांनी कोकाटेकडे पैसे परत मागितले.
कोकाटेने त्यांना एक नम्बर दिला व ते पैसे परत देतील, असे सांगितले. तब्बल सहा-सात वर्षे पाठपुरावा करुनही डबे यांना पैसे परत न मिळाल्याने व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अखेर डबे यांनी माटुंगा पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. घटनेचा अधिक तपास माटुंगा पोलिस करत आहेत.