महाराष्ट्रातील जर आपण कसमादे पट्टा म्हणजेच कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा या नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांचा विचार केला तर प्रामुख्याने कांदा आणि डाळिंब उत्पादक पट्टा म्हणून अख्या महाराष्ट्रात ओळखला जातो. अनेक वर्षापासून या पट्ट्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर डाळिंब लागवडीमध्ये सातत्य ठेवलेले होते व मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी डाळिंबाची उत्पादन होत असे.
परंतु कालांतराने डाळिंबावर तेल्या आणि मर रोगाने थैमान घातल्याने या पट्ट्यातील डाळिंबाच्या बागा नेस्तनाबूत झाल्या. त्यामुळे या पट्ट्यात पिकणाऱ्या डाळिंबाचे उत्पादन कमालीचे घटले होते. परंतु गेल्या दोन ते चार वर्षापासून परत या पट्ट्यातील शेतकरी डाळिंब लागवडीकडे वळले असून विपरीत नैसर्गिक परिस्थिती तसेच दुष्काळी परिस्थितीचा सामना करत या ठिकाणी लाल बुंद असे डाळिंब परत पिकू लागले आहेत.
याचिच परीनीती म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दत्तक घेतलेले मालेगाव तालुक्यातील सातमाने हे गाव डाळिंबाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. डाळिंबाने आर्थिक सुबत्ता मिळवलेले सातमाने या गावातील विनोद आणि रवींद्र जाधव यांनी निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेतले होते थेट बांगलादेशामध्ये रवाना केले.
मालेगाव तालुक्याचा डाळिंब बांगलादेशात रवाना
याबद्दलचे सविस्तर वृत्त असे की, दुष्काळी परिस्थिती आणि डाळिंबावरील अतिशय नुकसानकारक तेल्या रोग याचा यशस्वीपणे सामना करत मालेगाव तालुक्यातील सातमानेच्या विनोद आणि रवींद्र जाधव या बंधूंनी दर्जेदार आणि निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेतले व त्याची थेट विक्रीसाठी रवानगी बांगलादेशाला केली आहे.
विशेष म्हणजे या ठिकाणी त्यांच्या डाळिंबाला जागेवरच 120 रुपये किलो पर्यंत भाव मिळाला असून पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि बागेचे देखील प्रत्येक अंगाने व्यवस्थित काळजी घेतल्यामुळे त्यांनी दर्जेदार असे उत्पादन मिळवले आहे. त्यांच्या मातोश्री कासुबाई व बागेतील पाच मजुरांच्या हस्ते बागेची पूजा करण्यात आली व डाळिंबाची रवानगी साता समुद्रपार करण्यात आली आहे.
जर गेल्या पाच वर्षाचा डाळिंबाचा बाजारभाव पाहिला तर तो पन्नास रुपयांपेक्षा जास्तच राहिला आहे. यावर्षी देखील 70 ते 80 रुपये प्रति किलो या दराने डाळिंब विकले जात आहे. यामध्ये डाळिंबाच्या दर्जा नुसार म्हणजेच मध्यम प्रतीचा डाळिंब असेल तर 80 ते 100 रुपये व निर्यातक्षम डाळींब असेल तर 100 ते 125 रुपये किलोने विक्री होत आहे. सातमाने गावाला डाळिंबामुळे आर्थिक सुबत्ता आली असून याच जाधव भावंडांनी या ठिकाणी कृष्णा नावाने नर्सरी देखील सुरू केली आहे.
या नर्सरीतून ते या भागातील शेतकऱ्यांना डाळिंबाची दर्जेदार रोपे पुरवतात. आधुनिक पद्धतीने डाळिंब बाग फुलवला व मजूर टंचाईवर मात करण्याकरता त्यांनी यंत्रांचा वापर जास्त केला. त्यामुळे वेळेत कामे झाली व खर्च देखील वाचला. या बहरातील डाळिंबाची काढणी सुरू झाली असून सगळाच डाळिंब निर्यात केला जात आहे.
शेडनेटच्या साह्याने टोमॅटो आणि मिरचीचे देखील यशस्वी उत्पादन
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना देखील त्यांनी डाळिंब व्यवस्थितपणे पिकवला. डाळिंबा व्यतिरिक्त त्यांनी शेडनेटचा वापर करून शिमला मिरचीचे देखील चांगले उत्पादन घेतले आहे. एवढेच नाही तर शेडनेटच्या साह्याने त्यांनी टोमॅटोची पीक देखील उत्तम घेतले. राज्य शासनाचा आदर्श पुरस्कार व इतर पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.