महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवून आणला. रविवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी आपला वेगळा गट तयार केला. या गटातील नऊ आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले. अजित पवार यांच्यांसोबत जाणाऱ्या आमदारांची संख्या ४० पेक्षा जास्त असल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे शरद पवार पुन्हा मैदानात उतरले आहे.
दुसरीकडे शरद पवार देखील सक्रिय झाले असून राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सोमवारी कराडमध्ये दाखल झाले. या ठिकाणी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळाला भेट देत शक्तीप्रदर्शन केले.
शरद पवार यांच्यासह कराड येथे आमदार रोहित पवार, आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारीही उपस्थित आहेत.
दरम्यान शरद पवार हे सातारा येथे आल्यानंतर त्यांच्या कारमध्ये आमदार मकरंद पाटील हे बसलेले अनेकांनी पाहिले. अजित पवार यांच्या बंडानंतर मकरंद पाटील हे त्यांच्या समवेत असल्याची चर्चा हाेती. आज आमदार मकरंद पाटील यांना शरद पवारांसमवेत पाहून अनेकांचे आंनद झाला.
खासदार अमोल कोल्हे शरद पवारांसोबत
काल शपथविधीसाठी उपस्थित असलेले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे शरद पवारांसोबत आहेत,असं त्यांनी जाहीर केलं आहे. कोल्हे यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमोल कोल्हे शरद पवारांना भेटणार आहेत. मी शरद पवारांना भेटून माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं कोल्हे यांनी सांगितलं आहे.
त्याच क्षणी ते ९ जण अपात्र
जयंत पाटील म्हणाले, काल शपथविधीला गेलेले काहीजण, काही आमदार शरद पवार साहेबांना भेटायला गेले आहेत. राहिला प्रश्न आमच्याबरोबर किती लोक आहेत याचा तर आमच्याबरोबर सध्या ५३ वजा ९ म्हणजेच ४४ आमदार आहेत. आमची संख्या सध्या ९ जणांनी (आमदारांनी) कमी झाली आहे. दरम्यान यासंदर्भात जयंत पाटील म्हणाले, काल ज्या ९ जणांनी आमच्या पक्षाच्या धोरणाविरोधात जाऊन भाजपाबरोबर शपथ घेण्याचं काम केलं त्याच क्षणी ते ९ जण अपात्र ठरतात. त्यासंबधातील याचिका आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे. याबाबत मी आज सकाळी विधानसभा अध्यक्षांशी सविस्तर बोललो. आमची याचिका त्यांना मिळाली असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं.
आमदार निलेश लंके यांची भूमिका
आमदार निलेश लंके यांनी आपण सर्वजण एकत्र असल्याची भूमिका व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब असून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब,मा.अजितदादा पवार व मा.सुप्रियाताई सुळे हे आमचे नेते व कुटुंब प्रमुख आहेत असं निलेश लंके यांनी म्हंटलं आहे, पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि शरद पवार यांचे कट्टर समर्थक निलेश लंके यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे, ज्यात त्यांनी म्हटलं आहे. “येणाऱ्या दोन दिवसात सर्वाना अपेक्षित असा निर्णय होईल.”
आम्हाला माघारी यायचं आहे अनेकांचा फोन !
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा कराड येथे एक गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांना अनेकांचा फोन आला. आम्हाला माघारी यायचं आहे, असं अनेक आमदारांनी सांगितले असून, दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल असं देशमुख यांनी सांगितलं.
आजपासून नवीन लढाई सुरू
शब्द बदलू शकतात, पण त्याचा अर्थ बदलत नाही , असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे, आजपासून नवीन लढाई सुरू करणार असल्याचेही आव्हाड यांनी नमूद केले. शरद पवार साहेब आता रस्त्यावर आलेले आहेत. जमलेली गर्दी बघून जनसमर्थन कोणाच्या मागे आहे, याची सर्वांनाच कल्पना आली आहे, असेही आव्हाड म्हणाले.
माझ्या मतदारसंघात वातावरण काय होईल ?
“आमदार कुठेही असले, तरी सर्वजण टीव्ही आणि परिस्थिती पाहत आहेत. ज्या पद्धतीने कराडमध्ये शरद पवारांना प्रतिसाद मिळत आहे. यानंतर प्रत्येक आमदाराला ही भीती वाटेल, की येणारे काळात शरद पवार दौरे सुरु करतील. आणि माझ्या मतदारसंघात सभा घेतील. त्यांनतर माझ्या मतदारसंघात वातावरण काय होईल,” असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.