Exclusive

Pune Update : पुणे होईल आणखी स्मार्ट! उभारले जातील 40 हजार कोटींचे पूल आणि महत्त्वाचे रस्ते प्रकल्प, केंद्रीय मंत्री गडकरींनी दिली माहिती

Pune Update :- पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून एक आयटी हब देखील आहे. तसेच औद्योगिक दृष्टिकोनातून देखील पुणे व परिसराचा खूप विकास झालेला आहे. या दृष्टिकोनातून वाढती लोकसंख्या पाहता पायाभूत सोयी सुविधा असणे देखील तितकेच गरजेचे आहे. याच दृष्टिकोनातून पुण्यामध्ये विविध प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले असून येणाऱ्या काही दिवसात अजून काही प्रकल्प आणि उड्डाणपूल पुण्यामध्ये उभारण्यात येणार आहेत.

जेणेकरून पुण्यामध्ये जी काही वाहतूक कोंडीची समस्या आहे ती दूर व्हायला यामुळे मदत होणार आहे. काल पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपूल आणि खेड ते मंचर रस्ता चौपदरीकरणाच्या लोकार्पण  सोहळा पार पडला त्याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बोलताना बरीच महत्त्वाची माहिती दिली.

 पुण्यामध्ये साकारणार विविध प्रकल्प

पुण्यामधील ट्रॅफिकची समस्या दूर व्हावी याकरिता रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाच्या माध्यमातून पुण्यात तब्बल 40 हजार कोटींचे पूल बांधण्यात येणार आहेत. तसेच पुणे ते संभाजीनगर आणि पुणे ते बेंगलोर हे दोन अतिशय महत्त्वाचे रस्ते प्रोजेक्ट देखील लवकरच पूर्ण केलेत जातील अशी महत्त्वाची माहिती देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

काल चांदणी चौक येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण पार पडले तेव्हा या कामाविषयी माहिती देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, या प्रकल्पाकरिता संपूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले व अनेक प्रकारच्या समस्यांवर मात करत  या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे चांदणी चौक उड्डाणपूल बांधण्यामध्ये मलेशिया आणि सिंगापूर या ठिकाणच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून हा रस्ता तयार झाल्याचे देखील त्यांनी म्हटले.

 पुण्यात सुरू असलेले आणि काही दिवसात येऊ घातलेले महत्त्वाचे प्रकल्प

पुणे शहराशी संबंधित असलेल्या पुणे ते सातारा महामार्गावरील डबल डेकर पूल, हडपसर ते यवत उन्नत मार्ग, पुणे ते शिरूर व अहमदनगर हा 56 किलोमीटरचा मार्ग, तळेगाव-शिक्रापूर-चाकण हा 54 किलोमीटरचा मार्ग आणि नाशिक फाटा ते खेड या मार्गाचा प्रकल्प अहवाल देखिल तयार करण्यात आलेला आहे.

पुणे विभागामध्ये तब्बल पावणे दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प देण्यात आले असून त्यातील काही प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे असे देखील नितीन गडकरी यांनी म्हटले. तसेच महत्त्वाचे म्हणजे 12000 कोटी रुपये खर्चाचे संत ज्ञानेश्वर महाराज  आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग देखील या वर्षाच्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होतील असे देखील त्यांनी सांगितले.

 राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्त्वाची माहिती

पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा नुकताच सुरू करण्यात आला असून प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे व पुणे मेट्रोने पुणे कार्डच्या माध्यमातून चांगली सुरुवात केली असून हेच कार्ड पीएमपीएलला  लागू होईल अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे व भविष्यामध्ये देशातील जी मोठी शहरे आहेत या ठिकाणी देखील या कार्डचा उपयोग होऊ शकेल.

जर पुण्यामध्ये एकात्मिक स्वरूपाची वाहतूक व्यवस्था निर्माण केली व पाचशे मीटर वर नागरिकांना विविध वाहतूक पर्याय दिले तर नागरिक सार्वजनिक वाहतुकीचा जास्त उपयोग करतील व यासंबंधीची स्मार्ट सिस्टम तयार करण्यात येणार असल्यामुळे बसेसची वेळ त्यांच्या स्थान व प्रवाशांची संख्या कळण्यास मदत होईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

तसेच चांदणी चौकामध्ये जी काही वाहतूक कोंडी होते ती दूर करण्याकरिता आवश्यक प्रकल्पांच्या भूसंपादनाकरिता महानगरपालिकांना निधी देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला असून कात्रज ते कोंढवा रस्त्याच्या कामाकरिता  लागणारा भूसंपादना साठीचा निधी देखील देण्यात आला आहे व पुरंदरला विमानतळ होण्यासाठी देखील केंद्र सरकारचे सर्व मान्यता मिळाल्या असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

एवढेच नाही तर मुळा- मुठा शुद्धीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीसाठी आणि शहरांकरिता लागणारे पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल व पुण्यातील कचरा व्यवस्थापन आणि विविध प्रकल्पांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पुणे हे देशातील सर्वात सुंदर शहर म्हणून नावारूपाला येईल असे देखील फडणवीस म्हणाले.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts