कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही कधीच भव्य दिव्य स्वरूपामध्ये करता येत नाही. कधीही सुरुवात ही छोट्यातून करावी लागते व सातत्याने प्रयत्न करत त्यामध्ये उत्तुंगता प्राप्त करावी लागते. हिच बाब व्यवसायांना देखील लागू होते. कुठल्याही व्यवसायाची सुरुवात करायची म्हटली म्हणजे तुम्ही अगदी मोठ्या स्वरूपामध्ये करू शकत नाहीत. करायची जरी ठरवले तरी देखील त्यासाठी लागणारे भांडवल आणि धोके हे जास्त असल्यामुळे बऱ्याचदा नुकसान होण्याची शक्यता असते.
त्यामुळे छोटीशी सुरुवात करून तो व्यवसाय व्यवस्थित नियोजनाने आणि कष्टाने पुढे नेणे व त्याचा विस्तार करणे खूप गरजेचे असते. आपल्याला भारतातील आणि जगाच्या पाठीवरील बऱ्याच उद्योजकांची उदाहरणे घेता येतील की त्यांनी सुरुवात केली अगदी कमी प्रमाणात परंतु आज ते खूप मोठ्या यशाच्या शिखरावर पोहोचलेले दिसतात. अगदी हीच बाब वाव मोमोजचे सहसंस्थापक सागर दर्यानी यांच्याबाबत दिसून येते.
व्वाव मोमोजचे सह संस्थापक सागर दर्यानी यांची यशोगाथा
आपल्यापैकी बऱ्याच जणांना गरमागरम मोमोज आणि त्यासोबत मसालेदार चटणी खायला आवडते. परंतु याच व्यवसायामध्ये सागर दर्यानी यांनी खूप मोठी भरारी घेतलेली आहे. सागर यांनी मोमोज विकून दोन हजार कोटी रुपयांची कंपनी उभी केली असून प्रत्येक दिवसाला ते सहा लाख पेक्षा अधिक मोमोजची विक्री करतात. या स्थानापर्यंत पोहोचण्या अगोदरचा त्यांचा प्रवास पाहिला तर तो खूपच रोमांचक असा आहे.
साधारणपणे आपण विचार केला तर एका मध्यमवर्ग कुटुंबामध्ये मुलांच्या बाबतीत पालकांची अपेक्षा असते की त्यांनी शिक्षण घ्यावे व चांगली नोकरी करावी. अगदी हीच इच्छा सागर यांच्या आई वडिलांची देखील होती. या कालावधीमध्ये सागर हे कोलकत्ता येथील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये पदवीच्या वर्गात शिकत असताना त्यांनी वडिलांना सांगितले की मला मोमोज विकायचे आहे. हे ऐकून तर सागर यांच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली.
एवढेच नाही तर त्यांचे हे बोलणे ऐकून सागरच्या वडिलांना खूप राग आला. परंतु वडिलांचा विरोध असून देखील सागर थांबले नाहीत व त्यांनी सन 2018 मध्ये विनोद कुमार नावाच्या मित्राला सोबत घेतले व एका छोट्याशा स्टॉल मधून मोमोज चा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू करण्याकरता दोघांनी मिळून तीस हजार रुपयांची गुंतवणूक केली व यामध्ये एक सिंगल टेबल व दोन पार्ट टाइम शेफ घेऊन व्यवसायाला सुरुवात केली.
नेमका मोमोजचा व्यवसाय सुरू करण्याचे का ठरवले?
सागर दर्यानी यांनी नेमका मोमोजचा व्यवसाय करण्याचे ठरवले यामागे देखील एक कहाणी असून जेव्हा ते कॉलेजमध्ये असताना रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचे तेव्हा सागर आणि त्यांचे मित्र पिझ्झा, बर्गर किंवा मॅगी खायचे. तेव्हा या कालावधीमध्ये त्यांच्या डोक्यात एकदा विचार आला की बाहेरच्या कंपन्या येऊन भारतामध्ये अशा पद्धतीचा व्यवसाय करू शकतात तर भारतीय कंपनी विदेशात जाऊन असा व्यवसाय का करू शकत नाही व त्याच दिवसापासून त्यांनी व्यवसाय करण्याच्या त्यांच्या या कल्पनेवर स्टडी करायला सुरुवात केली.
त्यांच्या घराच्या शेजारी असलेल्या एक काकू मोमोज बनवायच्या व त्या काकूंच्या स्टॉल बाहेर ग्राहकांची लांबच लांब रांगा असायची. त्यामुळे सागर यांच्या मनात हीच व्यवसाय कल्पना आली व त्यांनी मोमोजचा ब्रँड बनवायचे ठरवले व त्यातूनच जन्म झाला तो वाव मोमोजचा. व्यवसाय सुरू करताना सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये त्यांना खूप अडचणींना तोंड द्यायला लागले. पहिला मुद्दा म्हणजे त्यांच्याकडे पैसा नव्हता व जागा देखील नव्हती.
तसेच मोजकेच लोक हाताशी होते. अशातच त्यांनी त्यांचा मित्र व सागर यांना एक कल्पना सुचली व कंपनीचे नाव आणि लोगो असलेल्या टी-शर्ट त्यांनी घेतला. तेच टी-शर्ट घालून ते दिवसभर फेरफटका मारायचे. लोकांना त्यांच्या वाव मोमोज ची माहिती व्हावी म्हणून ते ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी हे टी-शर्ट घालून जायचे. लोक देखील त्यांनी तयार केलेल्या मोमोजचे सॅम्पल खाऊन पहायचे व अशा पद्धतीने त्यांनी ग्राहक जोडायला सुरुवात केली. तसेच मोमोज मध्ये बदल करत त्यांनी तंदुरी मोमोज, फ्राय मोमोज यासारखे प्रकार लोकांना देऊ लागले व त्यांची हीच कल्पना यशस्वी ठरली.
आज आहे 2000 कोटींची कंपनी
अशा पद्धतीने खडतर प्रवास करून सुरू केलेला त्यांनी हा व्यवसाय आता हळूहळू खूप मोठे रूप धारण करू लागला. यामधील अनेक छोटे दुकानांचे रूपांतर आता आउटलेटमध्ये झाले आहे. संपूर्ण देशामध्ये मोमोज फ्रॅंचाईजी उघडत असून देशातील 26 राज्यांमध्ये 800 पेक्षा जास्त ठिकाणी त्यांनी पॉईंट ऑफ सेल उघडले असून या माध्यमातून जर पाहिले तर त्यांच्या कंपनीचे व्हॅल्युएशन 2000 कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.
एवढेच नाही तर या कंपनीने आतापर्यंत 68.5 मिलियन डॉलरचा निधी देखील उभा केला आहे. अशा पद्धतीने सागर दर्यांनी यांनी कोट्यावधींचे साम्राज्य उभे केले. यावरून आपल्याला दिसून येते की जर मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट घेतले व प्रचंड इच्छाशक्तीने पुढे जाण्याचे ध्येय ठेवले तर यश नक्कीच मिळवता येते.