Snake Farming Business: शेती म्हटले म्हणजे साधारणपणे आपल्या डोळ्यासमोर येते ती फळबागा, विविध पिकांची लागवड इत्यादी. त्याबरोबर शेतीसोबत केले जाणारे व्यवसाय जरी पाहिले तरी पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन, अलीकडच्या काळामध्ये पुढे येत असलेले बटेर पालन, ससे पालन आणि शहामृग पालन इत्यादी व्यवसायांचा समावेश करता येईल. ही झाली भारताच्या दृष्टिकोनातून शेतीचे आणि शेतीला असलेल्या जोडधंद्यांचे स्वरूप.
परंतु जर आपण भारता व्यतिरिक्त जगाच्या पाठीवर असणाऱ्या इतर देशांचा विचार केला तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय शेतीसोबत केले जातात. त्यातल्या त्यात आपण चीन या देशाचा विचार केला तर काही बोलायलाच नको. शेतीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत हे आपल्याला माहिती आहे. परंतु जगाच्या पाठीवर सापाची शेती केली जाते हे जर तुम्ही ऐकले किंवा वाचले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल किंवा तुम्ही समोरच्याला वेड्याच्या गणतीत तरी काढाल. परंतु चीनमध्ये सापाची शेती केली जाते. नेमकी ही शेती काय आहे? याबद्दलची माहिती आपण या लेखात घेऊ.
चीनच्या जीसीकीआयो या गावांमध्ये केली जाते सापाची शेती
चीनमध्ये जीसीकियाओ नावाचे एक गाव असून या ठिकाणी लोक सापाची शेती करतात व त्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे आर्थिक उत्पन्न देखील मिळवतात. विशेष म्हणजे या गावच्या लोकांचा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजे साप पालन आहे. या गावाला स्नेक व्हिलेज असे देखील म्हटले जाते. साधारणपणे 1000 लोकसंख्येचे हे गाव असून या ठिकाणी राहणारा प्रत्येक व्यक्ती सुमारे 30,000 सापांचे पालन करतो. यावरून या ठिकाणच्या या साप शेतीचे आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो.
सापाचा मांसाचा केला जातो उपयोग
सापांचे पालन करण्यामागील महत्वाचा हेतू म्हणजे सापाच्या मांसापासून त्या लोकांना खूप चांगल्या प्रकारचा आर्थिक फायदा मिळतो. हे मांस विकून या ठिकाणचे लोक खूप चांगला प्रकारे आर्थिक नफा मिळवत आहेत. विशेष म्हणजे सापाचे विष सोन्यापेक्षा जास्त महाग विकले जाते. कारण त्याला खूप मोठी मागणी देखील आहे. तर आपण साधारणपणे उदाहरण घेतले तर सर्वात जास्त विषारी सापाचे एक लिटर विष घेण्याकरिता तीन कोटी रुपये एवढा खर्च येतो.
कोरोना कालावधीमध्ये आपण चीनमधील अनेक व्हिडिओ पाहिले होते की तिथले लोक अनेक प्रकारचे किडे खातात. यामध्ये सापाच्या मांसाचा देखील समावेश आहे. सापांचे पालन करताना ते लाकडाच्या किंवा काचेच्या पेटीमध्ये पाळले जातात. तसेच सापाचे मांस, विष व त्यासोबतच कातड्यापासून देखील अनेक वस्तू बनवल्या जातात त्यामुळे कातडे देखील विकले जाते.
भारतात मात्र हे करणे अशक्य
भारताचा विचार केला तर भारतामध्ये आपण शेतीला व्यवसाय या नजरेतून पाहतो व आपल्याकडील शेतीचे स्वरूप म्हणजे साधारणपणे पिकांची लागवड अशा पद्धतीचे आहे. आपल्याकडे सापाची शेती वगैरे हा प्रकार आपण करू शकत नाही. कारण आपल्याकडे कायद्याने हा गुन्हा समजला जाण्याची दाट शक्यता असते. मध्ये ज्या प्रकारे सापांना मागणी आहे त्याप्रमाणे भारतात शून्य मागणी आहे. त्यामुळे भारतामध्ये सापांची शेती करणे शक्य नाही.