Success Story :- आजकालचे तरुण आणि तरुणी यांचा एक प्रमुख ट्रेंड म्हणजे उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करून स्पर्धा परीक्षांचा मार्ग पत्करून यामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे हा दिसून येतो. मुळात आजकालच्या तरुण-तरुणींचा विचारच असा असतो की उच्च शिक्षण हे नोकरी मिळवण्यासाठी प्रामुख्याने घेतले जाते. परंतु असे अनेक तरुण आणि तरुणी दिसतात कि ते उच्च शिक्षण घेत असताना देखील एखाद्या व्यवसायामध्ये असतात किंवा उच्च शिक्षण पूर्ण करून देखील एखाद्या व्यवसायात उडी घेतात व त्यामध्ये यश देखील मिळवतात.
साहजिकच उच्च शिक्षण घेऊन नोकरी मिळवणे व स्थिरस्थावर होणे हा एक रुळलेला मार्ग सोडून धोका पत्करून एखाद्या व्यवसायात येण्यामागे मनातील इच्छा आणि प्रचंड जिद्द देखील असणे गरजेचे असते. तरच व्यक्तीला यशस्वी होता येते. याच मुद्द्याला धरून जर आपण धाराशिव जिल्ह्यातील ढेकरी या गावच्या एका उच्चशिक्षित युवकाचा विचार केला तर या युवकाचा प्रवास थक्क करणारा आहे. याच युवकाची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
यूपीएससीची लेखी परीक्षा पास तरीदेखील दुग्ध व्यवसायात भरारी
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात ढेकरी हे गाव असून या ठिकाणी राहणारे रोहन ज्ञानदेव लाटे या तरुणाने बीसीएस मध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करावी म्हणून 2018 ते 2020 अशी दोन वर्ष पंजाब मध्ये काढली. या कालावधीत केलेला अभ्यास त्यांच्या कामाला आला व यूपीएससीच्या लेखी परीक्षेमध्ये रोहन पास झाला. परंतु आपल्याला माहित आहेच की मध्यंतरीच्या याच कालावधीमध्ये कोरोनाचा अख्या जगामध्ये उद्रेक झाला व भारतामध्ये देखील लॉकडाऊन लावण्यात आला.
या कालावधीमध्ये सगळ्या भरती प्रक्रिया देखील स्थगित झाल्यामुळे रोहन यांच्या मनात आले की या कालावधीमध्ये रिकामे बसण्यापेक्षा एखाद्या व्यवसायात उडी घ्यावी व काहीतरी करावे. त्यामुळे कोणता व्यवसाय करावा असे विचार मनात सुरू झाले. परंतु व्यवसायाची निश्चिती करताना पंजाब मध्ये जेव्हा अभ्यासासाठी रोहन होता तेव्हा त्याचे दोन मित्र त्या ठिकाणी होते व त्या मित्रांच्या घरी दूध डेरीचा व्यवसाय होता व त्यांच्याकडून या व्यवसायाचे संपूर्ण माहिती रोहनने घेतली आणि मनात पक्के केले की दूध व्यवसायात उतरायचे व या ठिकाणाहून सुरू झाला पुढचा प्रवास.
अशी केली सुरुवात
त्यानंतर रोहन याने वडिलांचा सल्ला घेतला व एचएफ जर्सी तसेच आयएसएफ या वाणाच्या पाच गाई खरेदी केल्या. दूध व्यवसायाला सुरुवात झाली व या गाईपासून चांगले दुधाचे उत्पादन मिळाल्याने उत्साह द्विगुणीत झाल्याने पाच गाईन वरून तब्बल 25 गाई विकत घेतल्या.
आज तीस गाई आणि पंधरा वासरे त्यांच्या शेडमध्ये असून एका गाईपासून एका वेळी 30 लिटर दूध उत्पादन त्यांना मिळत असून बारामती येथील सह्याद्री मिल्क या कंपनीला ते 32 ते 33 रुपये दराने दुधाची विक्री करतात. जर या दूध विक्रीतून दररोज मिळणारे आर्थिक उत्पन्न पाहिले तर ते आठ हजार रुपये मिळत आहे. अशा पद्धतीने त्यांनी दूध व्यवसायाची सुरुवात केली.
अशाप्रकारे केले आहे नियोजन
दुग्ध व्यवसाय सुरू करताना गाईंसाठी निवारा म्हणून शंभर बाय शंभर या आकाराचे पत्र्याचे शेड उभे केले व यामध्ये मुक्त संचार पद्धतीने गाई ठेवल्या. या व्यवसायामध्ये त्यांना घरच्यांची देखील मदत होत असल्याने जवळजवळ 30 जनावरांची देखभाल एक मजूर लावून ते करतात.
रोहन याने दूध व्यवसायातील सर्व तपशील या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून समजून घेतले व त्यांच्या सल्ल्यानुसारच गाईंचे पडलेले शेण उचलले जात नाही कारण शेण आणि मुत्रामध्ये उष्णता असल्यामुळे इतर किटाणू मरून जातात त्यामुळे गायींना कुठलाही आजार होत नाही. असे अनेक लहान-छान उपाययोजना त्यांनी त्यांच्या शेडमध्ये केल्या व यशाला गवसणी घातली.
या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की मनामध्ये जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी राहिली तर कुठल्याही व्यवसाय मध्ये माणूस मागे राहत नाही.