कुठल्याही पिकाचा विचार केला तर भरघोस उत्पादनाकरिता त्याच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत पाण्याचे नियोजन आणि आवश्यकता खूप महत्त्वाचे असते. पाण्याशिवाय शेती नाही असे म्हटले जाते. पाऊस जर कमी पडला तरी देखील पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो व उत्पादनात घट येते किंवा पिके सुकून जातात.
परंतु जर तुम्हाला कोणी सांगितले की पिकांच्या लागवडीनंतर दोन महिने पाणी दिले नाही तरी देखील पिकांची वाढ व्यवस्थित होईल तर तुम्हाला खरे वाटणार नाही. परंतु याच पद्धतीचे संशोधन जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असणाऱ्या ब्राह्मणशेवगे येथील तरुणाने केले असून त्याचे पेटंट देखील मिळवले आहे. त्यासंबंधीचेच महत्त्वपूर्ण माहिती आपण घेणार आहोत.
चाळीसगाव तालुक्यातील तरुणाचे भन्नाट संशोधन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव जिल्ह्यात असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मणशेवगे येथील सुनील पवार या तरुणाने हे भन्नाट संशोधन केले आहे. सुनील पवार यांच्या शिक्षणाचा विचार केला तर त्यांनी बीई( मेकॅनिकल इंजिनिअरिंग) सिंहगड अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग, कोंढवा पुणे या ठिकाणाहून पूर्ण केले आहे.
या तरुणाने एक नवीन संशोधन केले असून यासंबंधीचे पेटंट सरकारच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेले आहे एवढेच नाही तर पुढील २० वर्षापर्यंत या पेटंट साठी पवार यांना एकाधिकार देण्यात आलेले आहेत. या तरुणाने केलेल्या संशोधनामध्ये एक नवीन हायड्रोजेल फॉर्म तयार केला असून तो पूर्णपणे स्टार्च मटेरियल पासून बनवण्यात आलेला आहे.
यामध्ये मक्याच्या पावडरचा वापर करण्यात आला असून या पावडरची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते व या तरुणाने ती कॅपिसिटी एका युनिट टेक्नॉलॉजीने वाढवली आहे. जर आपण स्टार्चची साधारणपणे वॉटर होल्डिंग अर्थात पाणी धरून ठेवण्याची क्षमता पाहिली तर त्या क्षमतेमध्ये या तरुणाने स्वतःची टेक्नॉलॉजी वापरून 267 पटींनी वाढ केली आहे.
तसेच हा फार्मूला या तरुणाने प्रयोगशाळेमध्ये देखील टेस्ट केला असून या ठिकाणी शंभर टक्के सकारात्मक परिणाम मिळाले आहेत. तसेच पिकांसाठी देखील याची टेस्टिंग करण्यात आली असून यामध्ये देखील यश मिळवण्यात हा तरुण यशस्वी ठरलेला आहे.
एवढेच नाही तर वनविभागाच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या सुकलेल्या झाडांसाठी या फार्मूल्याचा वापर केला आणि एक ते दीड महिन्यानंतर ही संपूर्ण सुकलेली झाडे आता हिरवीगार झालेली आहेत. सुनील पवार यांनी हा फॉर्मुला गव्हर्मेंट कडे पेटंट केला असून लवकरात लवकर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी हा उपलब्ध व्हावा याकरिता सुनील पवार यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत.
हा फॉर्म्युला पिकांसाठी कसा वापरावा?
हा फॉर्म्युला पिकांसाठी वापरत असताना समजा तुम्हाला कपाशी किंवा कोणतेही भाजीपाला पीक किंवा फळबाग व इतर नगदी पिकांची लागवड करायची असेल तेव्हा सुनील पवार यांच्याकडून एक पावडर दिली जाईल व ही पावडर सेमी जेल स्वरूपात असेल. ही पावडर जमिनीमध्ये टाकून त्यावर तुम्हाला बियाण्याची लागवड करायची आहे.
बियाणे टाकल्यानंतर त्यावर साधारणपणे माती टाकून दोन महिन्यापर्यंत संबंधित पिकाला पाणी देण्याची गरज नसते व दोन महिन्यापर्यंत अगदी सामान्य स्थिती सारखी पिकांची वाढ होते. तसेच हा संपूर्ण फार्मूला जैविक असल्यामुळे त्याची जमिनीत राहण्याची क्षमता तब्बल सहा महिन्यांपर्यंत आहे. म्हणजे एकदा त्याचा वापर केल्याने सहा महिन्यापर्यंत ते काम करत राहते.
समजा दोन महिन्याचा कालावधी संपल्यानंतर तुमच्या विहिरीमध्ये जर पाणी असेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनिटे महिन्यामध्ये एकदा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी दिले तरी हा फॉर्म्युला परत रिचार्ज होतो व परत दीड ते दोन महिन्यापर्यंत काम करतो. त्यामुळे कमीत कमी पाण्यात देखील शेती करणे या फॉर्मुल्यामुळे आता शक्य होणार आहे.
तसेच दुसरा फायदा म्हणजे हा फार्मूला सेंद्रिय आणि जैविक असल्यामुळे सहा महिन्यानंतर हा ऑटोमॅटिक जमिनीत विघटीत होत असतो व विघटन झाल्यानंतर त्याचे रूपांतर नत्र, फॉस्फरस आणि पोटॅशियम मध्ये होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळतो म्हणजेच तुम्ही जर पुढच्या वर्षी दुसरे पीक घेत असाल तर या पोटॅशियम आणि फॉस्फेट चा फायदा त्या पिकाला होतो.
या फॉर्मुल्याची किंमत किती आहे?
याच्या किमतीबद्दल सुनील पवार यांनी म्हटले की, जेव्हा ट्रायल बेस साठी हा फॉर्म्युला वापरला किंवा तयार करण्यात आला तेव्हा एका एकर करीत 1000 ते 1200 रुपये इतका खर्च आला. परंतु याबद्दल त्यांनी म्हटले की यापुढे जाऊन जर आपण याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवले तर प्रति एकर साठी पाचशे ते सहाशे रुपये इतका खर्च येईल.