Exclusive

बद्रीनाथ अण्णांची कमाल! पहिल्याच वर्षी केळी लागवडीतून मिळवला 18 लाखांचा नफा, नेमकी काय युक्ती वापरली?

पिकांचे उत्पादन घेण्याला जितके महत्त्व आहे तितके ते विकण्याला देखील आहे. हातात मिळालेल्या उत्पादनाची विक्री व्यवस्था किंवा विक्रीचे व्यवस्थापन उत्तम पद्धतीने होणे खूप गरजेचे असते. भरघोस उत्पादन मिळवणे बहुतांशी शेतकऱ्याच्या हातात असते परंतु ते विकण्याचे कसब आणि कौशल्य असणं देखील शेतकऱ्यांमध्येच असते. याच कौशल्याचा बरेच शेतकरी वापर करून खूप चांगल्या पद्धतीने शेतीमालाची विक्री करून बाजार भाव मिळवतात.

ही बाब इतर पिकांना आणि फळबागांना देखील लागू होते. आता आपण उदाहरणच घेतले तर पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याने तब्बल साडेतीन एकरात केळीचे लागवड केलेली आहे व तब्बल या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी 5000 केळीचे खोड किंवा रोपे लावले आहेत. परंतु या माध्यमातून मिळालेल्या केळीच्या उत्पादनाची विक्री त्यांनी उत्तमपणे केली व तब्बल 18 लाखांचा नफा मिळवण्यात यशस्वी झाले. त्यांचे यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 पहिल्याच वर्षी केळीची लागवड आणि मिळवला 18 लाखाचा नफा

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बद्रीनाथ बोंबळे यांनी साडेतीन एकर क्षेत्रामध्ये केळी लागवड केली व तब्बल 5000 झाडे त्यांनी लावली. यामध्ये त्यांनी भरघोस उत्पादन मिळवले व पाच हजार झाडांपैकी 1000 झाडांवर उत्पादित झालेली केळी थेट इराण या देशाला निर्यात करून खूप चांगल्या पद्धतीने नफा मिळवला  अजून जे केळीचे पीक शेतामध्ये आहे ते देखील लवकरात लवकर निर्यात करण्याचा त्यांचा विचार आहे.

केळी लागवडीचे त्यांचे हे पहिलेच वर्ष आहे व त्या माध्यमातून त्यांनी 18 लाखांचा नफा मिळवला आहे. आपल्याकडील स्थानिक बाजारपेठेमध्ये केळीला जो काही भाव मिळतो त्यापेक्षा निर्यात होणाऱ्या केळीला अधिकचा भाव मिळतो हे देखील त्यांनी सांगितले.त्यांनी केळीचे व्यवस्थापन करताना खूप व्यवस्थित आणि काटेकोरपणे केले आणि साधारणपणे 28 किलोचा एक घड असे उत्पादन त्यांना मिळाले.

केळीच्या घडाला अठरा रुपये प्रति किलो असा दर त्यांना मिळाला. केळीची निर्यात केल्यामुळे एका वर्षात सहा लाखांचा एकरी नफा मिळाल्याचे देखील त्यांनी सांगितले. मागच्या वर्षी एक ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये केळीचे लागवड केली होती व बरोबर एक वर्षाने त्यांना केळीचे उत्पादन मिळायला सुरुवात झाली आहे. त्यातील पहिलीच एक तोडणी त्यांनी इराणला निर्यात केली असून यापुढे येणारा सगळा माल देखील आता दीड महिन्यात काढणीस तयार होण्याची शक्यता आहे.

केळी निर्यात करण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे?

निर्यातीच्या दृष्टिकोनातून जर केळीची लागवड करायची असेल तर लागवडीपासून तर पीक काढणीपर्यंत खूप व्यवस्थित व्यवस्थापन करणे गरजेचे असते. त्याकरिता केळी लागवड करण्याआधी जमिनीमध्ये शेणखत मोठ्या प्रमाणावर टाकावे तसेच वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशके व द्रवरूप बुरशीनाशके वापरून रोगांचा प्रादुर्भाव होण्याआधीच त्यांचे प्रभावी नियंत्रण करणे गरजेचे आहे असे देखील त्यांनी म्हटले.

जर आपण बद्रीनाथ यांचा केळी निर्यातीचा अनुभव पाहिला तर त्यांच्या मते यांच्या शेतावरून केळीची खरेदी संबंधित कंपनीने केली व ही खरेदी केलेली केळी 22 दिवसांनी इराणला  विक्रीसाठी काढली जाते. त्यामुळे महिनाभर आधी ती आपल्याला इथून पाठवणे गरजेचे असते.

याकरिता ती केळी नाशिक किंवा टेंभुर्णी या ठिकाणी असलेल्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात येते व त्यानंतर व्यवस्थित पॅकेजिंग करून निर्यात केली जाते.यामुळे इतर देशांमध्ये केळी पोहोचेपर्यंत तिचा दर्जा टिकावा याकरिता बाविस्टीन व तुरटीच्या पाण्यामध्ये केळी स्वच्छ धुतली जाते त्यानंतर कोल्ड स्टोरेजमध्ये ती साठवली जाते. या सगळ्या प्रक्रियेनंतर ती पॅकिंग केली जाते व मुंबई येथून बंदरातून पुढे निर्यात केली जाते.

 केळी लागवड ते निर्यातीपर्यंतचा खर्च

बद्रीनाथ बोंबळे यांनी केळीच्या G-9 वाणाची लागवड केली असून त्याकरिता एकूण सात लाख रुपयांचा खर्च त्यांना आला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून 80 टक्के अनुदान याकरिता मिळते व त्यातले थोडे अनुदानाचे व थोडे स्वतःचे असे पैसे यामध्ये त्यांनी खर्च केले आहे. या सगळ्या गुंतवणुकीतून त्यांना एकरी सहा लाखांचा नफा  साडेतीन एकर केळी पासून मिळाला आहे.

यावरून दिसून येते की जर शेतकऱ्याने  ठरवले तर मेहनत व जिद्दीच्या जोरावर शेतकरी काहीही साध्य करू शकतो. भरघोस उत्पादन मिळवणे शेतकऱ्याला कोणी शिकवण्याची गरज नाही. परंतु बाजारभाव शेतकऱ्याला मिळणे खूप गरजेचे आहे व तेच शेतकऱ्याच्या हातात नसल्यामुळे विपरीत परिस्थिती निर्माण होते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts