मनामध्ये जिद्द आणि काहीतरी करून दाखवण्याची तयारी असली तर कुठलीही अशक्य गोष्ट व्यक्ती शक्य करून दाखवू शकतो. यश मिळवण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती कधीच आडवी येत नाही. मनात ठरवलेले तडीस नेण्यासाठी जर प्रयत्न आणि कष्ट करण्याची ताकद आणि जिद्द राहिली तर व्यक्ती सगळ्या प्रकारचे अडथळे पार करत यश मिळवू शकतो.
याचा अनुषंगाने जर आपण अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर या शहरातील एका तरुणाचा प्रवास पाहिला तर तो थक्क करणार आहे. झोपडपट्टीमध्ये राहणारा आणि वडिलांना पोळपाट व लाटणे विकण्यास मदत करणारा तरुण पोलीस दलात भरती झाला असून त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.याच तरुणाची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलाची गगनाला गवसणी
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर या शहरामध्ये झोपडपट्टीत राहणारा तीस वर्षाचा केवल कतारी नावाचा तरुण त्यांचे वडील दारासिंग आणि आई मुन्नीबाई यांच्यासोबत राहतो व लाकडी पोळपाट, लाटणे बनवून ते यात्रेमध्ये किंवा आठवडी बाजारामध्ये विकण्याचे काम करत होता. कारण हा व्यवसाय त्याच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन असल्यामुळे सगळे कुटुंब हाच व्यवसाय करतात. केवलचा शैक्षणिक प्रवास पाहिला तर तो खूपच निराशा जनक असा आहे.
2008 यावर्षी त्याने दहावीची परीक्षा दिली आणि पहिल्या प्रयत्नामध्येच तो नापास झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे शिक्षण सोडावे लागले. या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आई-वडिलांना कामांमध्ये मदत करायचे त्याने ठरवले व स्वतः देखील पोळपाट आणि लाटणे बनवू लागला व बाजारामध्ये विक्री करू लागला. परंतु मोठा भाऊ आणि वडील यांनी केवलला प्रोत्साहन दिले व 2008 पासून शिक्षण सोडल्यानंतर तब्बल सहा वर्षाच्या गॅप नंतर 2014 ला केवलने पुन्हा दहावीची परीक्षा दिली व 48 टक्के मार्क मिळून तो उत्तीर्ण झाला.
परंतु यानंतर केवलने खूप कष्ट घेतले. दिवसा पोळपाट लाटणे बनवणे व लग्नामध्ये वाढपीचे काम करणे अशा पद्धतीचा त्याचा क्रम चालू झाला. दिवसा काम आणि रात्री अभ्यास असा रुटीन त्यांनी बनवून बारावीला आर्ट मधून परीक्षा दिली व 78% गुणांनी तो पास झाला. त्यापुढे संगमनेर महाविद्यालयांमध्ये ऍडमिशन घेऊन डिग्री देखील कम्प्लीट केली. परंतु केवलला पोलीस दलामध्ये जाण्याचे विशेष आकर्षण होते.कारण मुंबईमध्ये जेव्हा ताज हॉटेलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता तेव्हा महाराष्ट्र पोलिसांनी जी काही कामगिरी पार पाडली होती त्यामुळे त्याला खूप मोठ्या प्रमाणावर आकर्षण होते.
या सगळ्या बाबींमुळे त्यांनी निश्चय केला की काही करायचे व पोलीस भरतीसाठी प्रयत्न करायचा. या सगळ्या कालावधीमध्ये घरच्यांनी केवलचे लग्न देखील लावून दिले. परंतु या सगळ्या परिस्थितीशी संघर्ष करत त्याने अभ्यास चालू ठेवला व भरतीसाठी प्रयत्न सुरू ठेवले. शेवटी त्याच्या या संघर्षमय प्रवासाला व अथक मेहनतीला फळ आले व नुकतीच त्याची मुंबई पोलीस दलामध्ये निवड झाली. मुलाचे हे यश पाहून त्याच्या आईवडिलांचा उत्साह गगनात मावेनासा झाला.
कायम गरिबीत जगणारे आणि कष्ट करणारे आई-वडील मुलावर होणारा कौतुकाचा वर्षाव आणि त्याचे होणारे सत्कार समारंभ पाहून खूपच भारावून गेले आहेत. आता मुंबई पोलीस दलात निवड झाल्यानंतर पुढे कष्ट करून पीएसआय बनण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील केवलने सांगितले. यावरून दिसून येते की माणसाची आर्थिक परिस्थिती कधीच त्याच्या यशाच्या आडवी येत नाही.