१० जानेवारी २०२५ नागपूर : मैत्रिणीला आय फोन गिफ्ट देण्यासाठी घरफोडी करणाऱ्या दोन विधिसंघर्ष ग्रस्त बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.ही घटना कळमना हद्दीत घडली असून पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासांत उघड केला आहे.
दिघेश्वर किसनलाल रहांगडाले (३६, रा. कामनानगर, कामठी रोड),असे फिर्यादीचे नाव आहे.सोमवारी, ६ जानेवारी रोजी दुपारी ३ ते बुधवार, ८ जानेवारी रोजी दुपारी १२.३० यादरम्यान दिघेश्वर रहांगडाले हे त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावून परिवारासह सासऱ्याच्या गावाला गेले होते.
यादरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपींनी त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कडी-कोंडा कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर आरोपींनी बेडरूम मधील कपाटात ठेवलेले रोख १ लाख ४४ हजार रुपये चोरून नेले,अशी तक्रार फिर्यादी दिघेश्वर यांनी दिली होती.
या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.तपासादरम्यान कळमना पोलिसांच्या तपास पथकाने पेट्रोलिंग दरम्यान संशयितरीत्या रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या दोन विधिसंघर्ष ग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी वर नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली.
विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या ताब्यातून रोख रकमेपैकी १ लाख ४३ हजार २४० रुपये रोख जप्त करण्यात आले.उर्वरित रक्कम त्यांनी खाण्या पिण्यात खर्च केल्याचे सांगितले तसेच त्यांनी मैत्रिणीला आय फोन गिफ्ट देण्यासाठी चोरी केल्याचे सांगितले.कळमना पोलिसांनी चोवीस तासाच्या आत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला असून पुढील तपास सुरू आहे.