एका महिलेच्या पोटात वाढत असलेला जवळपास १५ किलोचा ट्यूमर अत्यंत कठीण शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीपणे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. एखाद्या रुग्णाच्या शरीरातून एवढी मोठी गाठ काढण्याची ही देशातील पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशातील या महिलेची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.
इंदौरमधील एका खासगी रुग्णालयातील एक डझनहून अधिक डॉक्टरांनी यशस्वीपणे महिलेवर शस्त्रक्रिया केली. मूळची सिहोर जिल्ह्यातील आष्टाची रहिवासी असलेल्या ४१ वर्षीय शीतल नामक महिलेला गत काही महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास होत होता.
तिच्या पोटात अंडाशयातील गाठ वाढत चालली होती. महिलेचे वजन फक्त ४९ किलो होते. जवळपास दोन तासांहून अधिक वेळ शस्त्रक्रिया करत डॉक्टरांच्या चमूने तिच्या पोटातून तब्बल १५ किलोचा ट्यूमर बाहेर काढला.
इतक्या वजनाचा ट्यूमर काढण्याची ही पहिली वेळ मानली जात आहे. शस्त्रक्रियेतील थोडीही चूक महिलेच्या जीवावर बेतली असती, असे डॉ. अतुल व्यास यांनी म्हटले. प्राथमिक चाचणीत शीतलच्या पोटात एक मोठे ओव्हेरियन ट्यूमर असल्याचे आढळले.
या गाठीमुळे महिलेला चालताना आणि जेवण करताना खूप त्रास होत होता. अखेर शस्त्रक्रियेद्वारे ही गाठ यशस्वीपणे काढण्यात आल्याचे व्यास यांनी सांगितले. जर वेळेवर ट्यूमर काढण्यात आला नसता तर ती गाठ फुटली असती, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. शीतलला अनेक रुग्णालयांत दाखवण्यात आले होते.