Health News : उन्हाच्या तडाख्यामुळे राज्यात उष्माघाताचे रुग्ण वाढू लागले आहेत. मार्चअखेरपर्यंत ही संख्या २३ वर पोहोचली आहे. २० मार्चपर्यंत १३ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र १० दिवसांत १० रुग्णांची वाढ झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
त्यामुळे उष्णतेशी संबंधित कोणताही आजार झाल्यास डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
सकाळी ८ वाजल्यापासून उन्हाचा तडाखा जाणवू लागतो. वाढत्या उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन नागरिकांना डिहायड्रेशनचा त्रास जाणवतो. उष्माघातामुळे आतापर्यंत २३ जणांना त्रास जाणवला आहे. उपचारानंतर या सर्वांना घरी पाठवण्यात आले.
दरम्यान, अद्याप मृत्यूची नोंद झालेली नसली तरी उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात चिंता वाढली आहे.
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गेल्या दोन आठवड्यांपासून दिवसाचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ३ रुग्ण,
बीडमध्ये दोन, तर रायगड मध्ये २, बुलढाणा २, पुणे २ आणि कोल्हापूरमध्ये २ रुग्ण आढळून आले आहेत. तर, अहमदनगर, अकोला, भंडारा, चंद्रपूर, सातारा, धुळे, जळगाव, नांदेड, सातारा आणि ठाण्यात आतापर्यंत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.