उन्हाळा प्रचंड कडक झाल्याचे जाणवत आहे. उष्णता वाढली आहे. तापमान जवळपास ४१ अंशावर गेले आहे.या उन्हाचा त्रास जसा माणसांना होतो तसाच जनावरांना देखील याचा प्रचंड त्रास होत असल्याचे दिसून येत आहे.
माणसांप्रमाणेच जनावरांनाही उष्माघात झटका बसू शकतो. विशेषतः दुभत्या जनावरांना याचा धोका अधिक असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.
उन्हाचा पारा वाढून उष्णता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून ४० डिग्री सेल्सिअसपर्यंत गेली आहे. मे महिन्यात आणखी तापमान वाढू शकते. सध्या ढगाळ वातावरण असल्याने उन्हाच्या झळा कमी झाल्या आहेत, परंतु वातावरणातील उष्णता कायम आहे. त्यामुळे जनावारांचे आरोग्य जपण्याचा सल्ला पशुसंवर्धन विभागाने दिला आहे.
तापमान व उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी पशुपालकांनी काळजी घ्यावी. यासाठी दुभत्या जनावरांच्या अंगावर दिवसांतून किमान दोन ते तीन वेळा थंड पाणी टाकावे. म्हशींना डुबण्याची सोय असल्यास पाण्यात सोडावे. पाण्यासाठी हौद असेल तर त्यात गूळ व मीठ टाकावे. उष्णतेमुळे आलेला अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. शेळ्या, मेंढ्यांना दुपारी १० ते ४ या वेळेत चरण्यासाठी सोडू नये.
जनावरांना उष्माघात झालेला आहे हे कसे ओळखावे ?
– डोळे लाल होऊन डोळ्यांतून पाणी गळायला लागतात.
– गोचीड ताप होते तसेच दुभत्या जनावरांना स्तनदाह होतो.
– उन्हाचा झटका बसल्यास चक्कर येऊ शकते.
अशी घ्या काळजी
– जनावरे सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत गोठ्यात बांधावीत. गोठा सिमेंट पत्र्यांचा असावा.
– गोठ्याची उंची कमी असल्यास फॅनचा वापर करा.
– दुभत्या जनावारांसाठी फॉगरचा वापर करा.
– बैलांकडून दुपारच्या वेळेत काम करणे टाळा.
– गोठ्याच्या छतावर पालापोचाळा, गवत टाकून त्यावर पाणी टाकावे.