Overthinking : विचार करणे हा माणसाचा स्वभाव धर्म असला तरी अनेकदा अतिविचाराने फायदा होण्याऐवजी नुकसानच झाल्याचे लक्षात येईल. तसे विज्ञानाने स्पष्ट केले आहे. अनेक लोक बारीक सारीक गोष्टीचा खूप विचार करतात. त्यामुळे अशा लोकांचे मन कधीही शांत राहत नाही.
त्यामुळे त्यांच्यात ताणतणाव वाढतो. मात्र याचा परिणाम शरीरावर होऊ लागतो. त्यामुळे आपल्या मेंदूवर दबाव पडतो आणि अनुषंगाने शरीराच्या इतर अवयवांवर देखील त्याचा परिणाम होतो आणि अनेक गंभीर आजार निर्माण होतात.
जास्त विचाराने आपल्यात डिप्रेशन येऊ शकते. त्यामुळे कोणत्याही गोष्टींचा जास्त विचार करणे थांबवले पाहिजे. जास्त विचार केल्यामुळे तुमच्या मेंदूतील क्रिया मंदावतात तसेच तुमच्या विचार क्षमतेवरदेखील त्याचा गंभीर परिणाम होतो.
अनेकदा आपल्याला एकटेपण वाटू शकते किंवा खूप दुःखी होऊ शकता. जास्त विचारांचा पहिला परिणाम होतो तो म्हणजे आपला रक्तदाब वाढू लागतो. ताणतणाव येऊ लागतो. त्याचा परिणाम अर्थातच आपल्या हार्मोन्सवर होताना दिसतो.
आपल्या आचार- विचारांचा परिणाम शरीरावर होत असतो तो असा. शरीरातील हार्मोन्स बदलामुळे आपोआप हृदयाचे ठोके वाढू लागतात. त्यातून आपण हृदयविकाराला बळी पडू शकतो.
■अतिविचार करण्यावर कसा अंकुश ठेवावा
आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा विचार केला तर जगणे कठीण होईल. काही गोष्टी येणाऱ्या काळावर सोडून द्यायला हव्यात. भविष्यात काय होईल, याचा आताच विचार करून वर्तमानकाळ वाया घालवू नये.
त्यासाठी विविध कामांत आपण स्वतःला गुंतवून घेतले पाहिजे. आपल्या अतिविचाराने कोणतेही प्रश्न आपोआप सुटणार नाहीत, हे ध्यानात ठेवायला हवे. अतिविचार नेहमीच धोकादायक असतात.
• आवश्यक झोप घ्या
वयानुसार ७-८ तास रात्रीची झोप आवश्यक आहे. जास्त विचार केला तर तुम्हाला झोप शांत लागू शकत नाही. तुमचे मन अस्वस्थ होते, अशावेळी तुम्हाला शांत झोप लागत नाही. तसेच पुरेशी झोप न घेतल्यामुळे तुम्हाला अनेक वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.
•योगाला महत्त्व द्या
योगा केल्याने आपल्याला मानसिक शांती मिळू शकते. आपले शरीरस्वास्थ्य चांगले राहते आणि त्यामुळे अतिविचार करण्यावर काही प्रमाणात अंकुश राहतो. त्यामुळे रोज चालणे किंवा थोडा व्यायाम करण्यानेही अतिविचाराला लगाम लागू शकतो.