Health News : गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, मिरी, करंजी, चिचोंडी, परिसरातील अनेक गावांत डेंग्यूसदृश्य आजाराने डोकेवर काढल्यामुळे ग्रामीण भागातील दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत.
प्रत्येक गावात सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने पाण्याचे डबके साचून या आजाराने अनेक जण आता फणफणले आहेत. तिसगाव, करंजी, मिरी, या ठिकाणीदेखील डेंगूदृश्य आजारामुळे अनेकांना दवाखान्यात दाखल होण्याची वेळ आली आहे.
या डेंग्यूदृश्य आजारामुळे शरीरातील प्लेटलेट झपाट्याने कमी होतात, रुग्णाला थकवा जाणवतो, त्यामुळे अनेकांना दवाखान्यात दाखल झाल्याशिवाय पर्याय नसतो. अशा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे बहुतांश दवाखान्यांमध्ये डेंग्यूदृश्य आजारासह इतरही किरकोळ आजारामुळे अॅडमिट होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.
डेंगूसदृश्य आजार टाळण्यासाठी घरातील पाणी झाकून ठेवावे, साचलेल्या पाण्यात हे डास वास्तव्य करतात, त्यामुळे डेंग्यूसदृश्य आजाराला सामोरे जावे लागते, त्यामुळे घर व परिसर स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. थकवा येणे, ताप येणे, अशी डेंग्यूची लक्षणे आहेत. : डॉ. समर रणसिंग, तिसगाव
डेंग्यूसदृश्य आजार टाळण्यासाठी हौदातील तसेच प्लॅस्टिकच्या टाक्यांमधील पाणी झाकून ठेवावे, घराजवळ टायरमध्ये अथवा साचलेले पाणी फेकून द्यावे, आठ दिवसातून एक दिवस कोरडा दिवस पाळवा, ताप येणे, डोळ्यांची जळजळ होणे, डोके दुखणे, थकवा येणे, ही लक्षणे दिसताच डॉक्टराशी संपर्क साधावा. डॉ. नंदकिशोर नरसाळे, मिरी.