Nipah Virus : केरळ राज्यात ‘निपाह’ विषाणूचा संसर्ग झाल्याने दोन मृत्यू झाले आहेत. केरळमध्ये पुन्हा एकदा निपाह व्हायरसने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. कोझिकोड जिल्ह्यात या व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील आरोग्य विभाग त्यामुळे अलर्ट मोडवर असून उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीविषयी चर्चा करण्यात आली आहे.
त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या साथरोग विभागानेही सर्व जिल्ह्यांच्या आरोग्य विभागाला निपाहबाबत सर्वेक्षण व खबरदारी घेण्याच्या सूचना राज्याचे हिवताप व जलजन्य रोग विभागाचे सहसंचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी केल्या आहेत.
या विषाणूचा प्रसार हा मुख्यत्वे फळांवर जगणाऱ्या वटवाघळांमार्फत होतो. वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्ल्याने हा आजार होतो. डुक्कर आणि इतर पाळीव प्राणी यांनादेखील यांची बाधा होऊ शकते.
निपाह विषाणूची लागण माणसापासून माणसाला होऊ शकते. रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांना लागण होऊ शकते. वटवाघळाच्या स्रावामुळे दूषित झालेला खजुराच् झाडाचा रस प्यायल्याने देखील या विषाणूचा प्रसार होतो. शेतात जंगलात अथवा इतरत्र पडलेली फळे खाणे टाळावे.
डॉ. सारणीकर यांनी दिलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे की, या आजाराचा आपल्या राज्याला फारसा धोका नसला तरी या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्रातही खबरदारी घेणे आवश्यक आहे. निपासदृश आजाराचे (मेंदूज्वर/ एईएस) सर्वेक्षण सर्वस्तरावर करा व तसेच प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना आखाव्यात.
या पार्श्वभूमीवर अक्यूट इन्सेफेलायटिस सिंड्रोम म्हणजेच ‘एईएस’ रुग्णांचे सर्वेक्षण करा. रुग्णाला ताप, डोकेदुखी, झोपाळूपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे असल्यास त्याला संशयित म्हणावे. रुग्ण मेंदूज्वर अथवा इतर मेंदूज्वराकरिता निगेटिव्ह असला व त्याने मागील ३ आठवड्यांत निपाहबाधित भागामध्ये विशेषतः केरळ, ईशान्य भारतात अथवा बांगलादेश सीमेलगतच्या भागात प्रवासाचा इतिहास असल्यास त्यालाही संशयित रुग्ण संबोधावे. अशा रुग्णाला विलगीकरण कक्षात भरती करावे, त्याचा नमुना पुण्यातील एनआयव्हीमध्ये पाठवावा, अशा सूचना दिल्या आहेत.
■ अधिशयन कालावधी – ५ ते १४ दिवस लक्षणे :
निपाह विषाणू आजारात ताप, अंगदुखी, डोकेदुखी, झोपाळूपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात. आजवरील उद्रेकात मृत्यूचे प्रमाण ४० ते ७० टक्के एवढे आहे.
उपचार :
निपाह विषाणू आजारावर कोणतेही विशिष्ट औषध नाही. ‘रॉबविरिन’ हे विषाणूविरोधी औषध वापरले असले तरी मुख्यत्वे लक्षणांआधारे जात यावर भर दिला जातो. उपचार आणि सहाय्यभूत शुश्रूषा केली जाते.