Health Tips:- शरीर आरोग्यदायी राहण्यासाठी तुम्हाला तुमची जेवणाची वेळ तर रात्री झोपण्यापासून तर सकाळी उठण्यापर्यंत वेळेचे भान ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण शरीराच्या आरोग्यावर अनेक बारीक सारीक बाबींचा परिणाम होत असल्यामुळे आरोग्य सुदृढ आणि निरोगी ठेवायचे असेल तर प्रत्येक बाबतीत काळजी घेणे खूप गरजेचे आहे व वेळ देखील पाहणे खूप महत्त्वाचे आहे.
जर आपण सध्याचा ताणतणाव आणि व्यस्त जीवनशैली पाहिली तर अनेक व्यक्तींचे शारीरिक आरोग्याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होते व त्यामुळे अनेक गंभीर आजारांची समस्या आपल्याला डोके वर काढताना दिसते. शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी जितका आहार आवश्यक आहे तितकी झोप ही खूप महत्त्वाची आहे.
परंतु सध्याच्या कालावधीमध्ये ताण तणाव असल्याने बऱ्याच जणांना झोप वेळेवर येत नाही किंवा झोप पुरेशी होत नाही. खूप रात्रीपर्यंत जागे राहणे किंवा मोबाईलवर काहीतरी बघत राहणे हा दिनक्रम झालेला असतो. त्यामुळे रात्री उशिरा झोपणे व सकाळी देखील उशिरा उठणे ही सवय बऱ्याच जणांना असते.
परंतु जर तुम्हाला देखील उशिरा उठायची सवय असेल तर ती आरोग्याच्या बाबतीत खूप घातक ठरू शकते. या अनुषंगाने आपण या लेखामध्ये उशिरा उठल्यामुळे कोणते आजार किंवा कोणत्या समस्या उद्भवू शकतात? याबद्दलचे महत्त्वाची माहिती घेऊ.
उशिरा उठायची सवय असेल तर निर्माण होऊ शकतात समस्या
1- पचनाच्या संबंधित समस्या– उशिरा उठण्यामुळे शरीराची जी काही पचनशक्ती असते ती अतिशय मंदावण्याची शक्यता असते व त्यामुळे पोट फुगणे तसेच बद्धकोष्ठता व आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो.
जर या प्रकारचा त्रास जास्त प्रमाणात वाढला तर मुळव्याध होण्याचा धोका वाढतो. आपल्याला माहित असेलच की उशिरा उठणाऱ्या लोकांमध्ये पचनाशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या असतात.
2- डायबिटीस( मधुमेह)- रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण हा देखील एक दैनंदिन जीवनशैलीतील अनियमितता याच्याशी संबंधित आजार असून जर आपण उशिरा उठलो तर जेवण देखील बऱ्याचदा उशिरा होते.
यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते व भुकेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. जेवणाच्या वेळा बदलतात किंवा बऱ्याच जणांचा आहार हा संतुलित नसतो व त्यामुळे डायबिटीसचा धोका वाढतो.
3- हृदय रोगाची समस्या– उशिरा उठल्यामुळे सकाळचा जो काही महत्त्वाचा सूर्यप्रकाश असतो तो आपल्याला मिळत नाही व त्यामुळे शरीरातील हार्मोन्स अर्थात संप्रेरकांची पातळी बिघडू लागते.
त्यामुळे साहजिकच रक्तदाबाची पातळी आणि खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. या सगळ्या परिस्थितीमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते.
4- वजन वाढणे किंवा लठ्ठपणाची समस्या– उशिरा उठण्यामुळे शरीरातील चयापचय क्रिया देखील मंद होते व कॅलरी बर्न करण्यात अडचणी निर्माण होतात. या परिस्थितीमुळे शरीरात चरबी जमा व्हायला लागते व व्यक्तीला लठ्ठपणा येऊ शकतो. त्यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होते व काही आजार देखील यामुळे होऊ शकतात.