Health News : उन्हाळ्यात थंड पेये पिण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे उन्हाळ्यात शीतपेयांची मागणी वाढत असते. मात्र या मागणीचा गैरफायदा घेऊन काही व्यावसायिक या शीतपेयांचा गोडवा वाढवण्यासाठी सॅकरीनचा सर्रास वापर करत आहेत.
यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. नागरिकांनीही आपण गोड पदार्थ नाही, तर आजार विकत घेतोय, याची जाणीव ठेवणे आवश्यक बनलेले आहे.
यंदा उन्हाळा कडक राहिला. अनेक दिवस उष्णतेने चाळीशी पार केली होती. त्यामुळे उष्म्याने नागरीक हैराण झाले आहेत. अशा वेळी उन्हाच्या प्रकोपापासून दिलासा मिळण्यासाठी लोक शीतपेय पिण्यास व थंड पदार्थ खाण्याला प्राधान्य देतात.
या काळात नागरिकांमधून विविध कंपन्यांच्या शीतपेयांबरोबरच आईसक्रिम, बर्फ गोळा, कुल्फी यासारख्या पदार्थांना उच्च मागणी असते. या थंड पदार्थांची मागणी पाहाता काही व्यावसायिक साखरेऐवजी सॅकरीनचा वापर करीत आहेत.
साखरेपेक्षा किती तरी पटींनी गोड असलेले सँकरीन हे एक केमिकल आहे. हे सॅकरीन नागरिकांच्या आरोग्यावर घातक परीणाम करते. हे किती वापरावे, याबाबत प्रमाण ठरवून देण्यात आले आहे; परंतु अनेक जण थोडड्या फायदद्यासाठी सॅकरीनचा अतिरेकी वापर करीत आहेत. त्यामुळे शरीरावर घातक परिणाम होण्याची शक्यता असते.
सॅकरीन हे पाण्यात विरघळत असल्यामुळे निरनिराळ्या पदार्थात किंवा थंड पेयांत ते सहजासहजी मिसळते. तसेच ते साखरेपेक्षा स्वस्त असल्याने ते वापरायला परवडते. जास्त नफा मिळतो. मात्र सँकरीनच्या अतिसेवनामुळे कर्करोग होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. काही देशांत सँकरीन अन्न पदार्थांमध्ये वापरण्यास बंदी आहे. त्यामुळे सॅकरीनचा वापर टाळणे कधीही चांगले.
प्रशासनाचे दुर्लक्ष
बर्फ गोळा, गारेगार, आईसक्रीम, लस्सी, सरबत आदी उन्हाळ्यात जास्त पिण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये सॅकरीनचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे; परंतु याकडे अन्न व औषध प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सॅकरीनमुळे पदार्थांचा गोडवा वाढत असला, तरी नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.
मिठायांमध्येही होतोय वापर ?
उन्हाळ्यात तयार केल्या जाणाऱ्या थंड पदार्थामध्ये सॅकरीन वापरले जातेच; परंतु अनेक दुकानदार मिठाईमध्येही सॅकरीन वापरतात. हे सर्वात घातक आहे. कारण ही मिठाई सर्व वयोगटातील लोक वर्षभर खात असतात.
काय आहे सॅकरीन ?
सॅकरीन हे एक सिंथेटिक स्वीटनर आहे. हे साखरेपेक्षा ३०० ते ४०० पट गोड असते; परंतु त्यात कॅलरीज नसतात. हे सॅकरीन आरोग्यासाठी घातक आहे. अनेकांना सॅकरीनची अॅलर्जी असते, अशा लोकांमध्ये सॅकरीनचे सेवन केल्या केल्या लगेच आजाराची लक्षणे आढळून येतात.