Health News : बदललेल्या वातावरणाचा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे दवाखान्यांमधील रुग्णसंख्येत वाढ होत आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरदेखील ताण निर्माण झाला आहे.
ऋतू बदलत असताना विषाणूजन्य संसर्गामध्ये वाढ होते. सध्या सर्दी, खोकला, अपचन व तापाचे रुग्ण अधिक प्रमाणात उपचारासाठी दाखल होत आहेत. विशेष म्हणजे सध्या रक्त तपासणीवर भर देण्यात येत आहे.
प्लेटलेटस कमी झाल्यावर रुग्णालयात दाखल व्हावे लागत असल्याने रुग्णालये फुल्ल झाली आहेत. आजारी व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिकण्यातून उडालेले विषाणू हे हिवाळ्यातील कोरड्या हवेत जलदगतीने संसर्गाचे संक्रमण करतात, त्यामुळे संसर्गाचा वेग लक्षणीय असतो.
नागरिक घरी, प्रवासाच्या निमित्ताने गर्दीत मिसळतात. संसर्गाच्या प्रसाराला त्यामुळे अधिक चालना मिळते. हिवाळ्यातील आजाराची लक्षणे सर्वच रुग्णांमध्ये दिसून येतातच असे नाही, तर अनेकदा ती अत्यंत सौम्य असतात.
मात्र, आजारी पडल्यानंतर दोन आठवड्यांपर्यंत अशा व्यक्ती इतरांना संसर्गाचे संक्रमण करू शकतात. कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे. त्यातच काहींना डेंग्यूसदृश्य तापाची लक्षणे आढळत असल्याने चिंता वाढली आहे.
रोग प्रतिकारक शक्ती कमी असलेले रुग्ण हे प्रामुख्याने अशा आजाराबाबत जोखीम गटात मोडतात. ज्येष्ठ नागरिक, लहान बालके, गरोदर महिलांनी खोकला व ताप यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. घरी केलेला ताजा व चौकस आहार घेणे व भरपूर पाणी पिणे महत्वाचे आहे.