आरोग्य

चीनमधील आजाराचा भारताला धोका आहे का नाही ? मंत्रालयाने स्पष्टच सांगितले…

Health News : चीनमधील मुलांमध्ये वेगाने पसरणाऱ्या श्वसनाशी संबंधित विकार आणि एच९एनर संसर्गावर आमचे बारकाईने लक्ष असल्याचे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. तसेच चीनमधील या आरोग्य संकटाचा भारताला धोका नाही, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.

चीनमध्ये अज्ञात न्यूमोनियाचा उद्रेक झाला आहे. न्यूमोनियासारखी लक्षणे असलेल्या या रहस्यमयी श्वसन विकाराने प्रामुख्याने लहान मुलांना विळखा घातला आहे. चीनमधील एन्फ्लुएंझामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी भारत सज्ज असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

लहान मुलांमधील या श्वसनाच्या आजाराचे सामान्य कारण समजले आहे. कोणतीही आकस्मिक वैद्यकीय स्थिती निर्माण झालेली नाही, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. यासंदर्भात आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या नेतृत्वात एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत चीनमधील एच९एन२ संसर्गाबाबत तसेच देशात हा संसर्ग पसरू नये म्हणून आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील चीनमधील या रुग्णवाढीवर चिंता व्यक्त करत श्वसनाशी संबंधित या अज्ञात आजाराबद्दल माहिती देण्याची विनंती या देशाला केली आहे.

यापूर्वी सार्स आणि कोविड-१९ आजाराची सुरुवातदेखील अशाच प्रकारच्या अज्ञात न्यूमोनियाने झाली होती. त्यामुळे आरोग्य संघटना वेळीच सावध झाली आहे.

दरम्यान, चीनमधील रुग्णसंख्या वाढीमागे कोणताही असामान्य अथवा नवा आजार नसल्याचे चिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानुसार कोरोना निर्बंध उठवल्यामुळे श्वसनाच्या विकाराचे रुग्ण वाढत चालले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Health News

Recent Posts