Marathi News : भारतीयांचे आयुष्य होतंय कमी ! कारण वाचून बसेल धक्का

Marathi News

Marathi News : वायुप्रदूषणामुळे आयुष्यमान घटत असल्याने हा मानव जातीसमोरील सर्वात मोठा जागतिक धोका ठरत असल्याची चिंताजनक बाब एका ताज्या अहवालातून अधोरेखित झाली आहे.

यामध्ये सर्वाधिक फटका बसणाऱ्या सहा देशांमध्ये भारताचा समावेश असून राजधानी दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचेही अहवालात नमूद केलेले आहे.

प्रदूषणाचा वाढता आलेख असाच कायम राहिला तर भारतात प्रत्येकाचे सरासरी आयुष्यमान ५.३ वर्षांनी, तर दिल्लीकरांचे आयुष्यमान ११.९ वर्षांनी घटण्याची शक्यताही संशोधकांनी व्यक्त केली आहे.

सूक्ष्म कणांमुळे होणाऱ्या (पीएम २.५ ) वायुप्रदूषणाबाबत डब्ल्यूएचओचे दिशानिर्देश काटेकोरपणे अमलात आणल्यास जगभरात नागरिकांचे सरासरी आयुष्यमान २.३ वर्षांनी वाढेल, असा आशावादही संशोधकांनी व्यक्त केला आहे.

अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट (एपिक ) ने आपल्या वार्षिक वायू गुणवत्ता जीवन निर्देशांक अर्थातच ‘एक्यूएलआय’ अहवालातून वायुप्रदूषणाच्या जागतिक परिस्थितीचा लेखाजोखा मांडला आहे.

अहवालानुसार, २०२१ साली जागतिक प्रदूषण वाढल्यामुळे मानवी आरोग्यावरील धोकाही वाढला आहे. त्यामुळे वायुप्रदूषण मानवी आरोग्यासाठी सर्वात मोठा बाह्य धोका ठरत असून जागतिक आयुष्यमानावरही याचे दुष्परिणाम होत असल्याची बाब या अहवालात नमूद करण्यात आलेली आहे.

या संकटाचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या सहा देशांमध्ये बांगलादेश, भारत, पाकिस्तान, चीन, नायजेरिया व इंडोनेशिया या सहा देशांचा समावेश होत असल्याचेही शिकागो विद्यापीठातील प्राध्यापक मायक ग्रीनस्टोन यांनी सांगितले. अशा स्थितीत जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) दिशानिर्देश काटेकोरपणे लागू करीत सूक्ष्म कणांमुळे होणारे वायुप्रदूषण (पीएम २.५) घटवण्यास मदत होऊ शकते.

असे झाल्यास जगातील प्रत्येक व्यक्तीचे आयुष्यमान सरासरी २.३ वर्षांनी वाढेल, असा आशावादही अहवालातून संशोधकांनी व्यक्त केला आहे. डब्ल्यूएचओने वार्षिक सरासरी सूक्ष्म कण प्रदूषणाची मर्यादा कमाल ५ मायक्रोग्राम प्रतिघनमीटर एवढी ठरवून दिलेली आहे.

मात्र, भारतातील १.३ अब्ज लोक त्याहून जास्त पातळी असलेल्या क्षेत्रात राहतात. डब्ल्यूएचओनुसार प्रदूषणांची मर्यादा पाळली गेली नाही, तर भारतीयांचे सरासरी आयुष्य ५.३ वर्षांनी घटू शकते. त्याचवेळी जगातील सर्वाधिक प्रदूषित मोठे शहर असलेल्या दिल्लीतील प्रदूषणाची समस्या अशीच कायम राहिली, तर १.८० कोटी दिल्लीकरांचे आयुष्यमान ११.९ वर्षांनी घटेल, अशी चिंताही संशोधकांनी व्यक्त केली आहे..

सूक्ष्म कणांमुळे होणारे वायुप्रदूषण वाढत असून १९९८ ते २०२१ या कालावधीत भारतातील सरासरी वार्षिक कण प्रदूषण ६७.७ टक्के वाढले आहे. ज्यामुळे यापूर्वी भारतीयांचे सरासरी आयुष्य २.३ वर्षांनी घटले आहे.

एचआयव्ही (एड्स), मलेरिया व क्षयरोग यासारख्या आरोग्य संकटांसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात जागतिक निधी जमा केला जातो. वायुप्रदूषणासारख्या संकटासाठीही अशाच प्रकारे गुंतवणूक वा निधी निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe