१० जानेवारी २०२५ बुलढाणा : शेगाव तालुक्यातील अकरा गावांमध्ये केस गळती होऊन टक्कल पडण्याच्या अज्ञात रोगामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.गुरुवारच्या तपासणीत सहा गावांमध्ये ५२ रुग्ण आढळले,त्यात आज आणखी पाच गावांमधील ४८ टक्कलग्रस्तांची वाढ होऊन रुग्णसंख्या शंभरावर पोहोचली आहे.अजूनही केस गळतीचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाच्या पथकांनी घरोघरी सर्वेक्षण सुरू केले असून,डोक्यावरील त्वचेचे पाच नमुने अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बायोप्सी चाचणी करिता पाठविले आहेत. तसेच आज हेवी मेटल्सच्या तपासणीसाठी नायट्रेट व टीडीएस जास्त प्रमाणात आढळलेल्या पाण्याचे नमुने नागपूरला पाठविण्यात आले आहेत.या नमुन्यांचा अहवाल आठवडाभरात प्राप्त होईल,अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिली.
शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, हिंगणा, घुई या सहा गावांमध्ये लहान मुले, मुली, महिला व पुरुष अशा ५२ जणांना केस गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर ७ जानेवारी रोजी अधिकारी, डॉक्टर व कर्मचारी अशा ५० जणांची टीम शेगाव तालुक्यात पोहोचली.विविध पथके नेमून सहाही गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले.
त्वचारोग तज्ज्ञामार्फत डोक्याची तपासणी केली असता फंगल इन्फेक्शनमुळे केस गळत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला.स्पष्ट निदान अद्याप झाले नसलेतरी पाण्याचे आणि त्वचेचे नमुने घेणे महत्त्वाचे होते. ७ जानेवारीला सहाही गावांमधील पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला.
त्यात काही गावांमधील बोअरवेलच्या पाण्यात ५४.०८ एवढे नायट्रेटचे प्रमाण आढळून आले. तसेच २११० या प्रमाणात टीडीएस असल्याचे समोर आले.हे पाणी पिण्यास व वापरण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने या पाण्याचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.
या गावांमध्ये केस गळती शेगाव तालुक्यातील बोंडगाव येथे १९ ग्रामस्थांना केस गळतीमुळे टक्कल पडले. तसेच कालवड येथे १५, कठोरा ८. भोनगाव ४, मच्छिंद्रखेड ५, हिंगणा वैजिनाथ ६, घुई ८, तरोडा कसबा १०, माटरगाव ८, पहुरजिरा १२ व निंबी येथे ५ असे शंभर लोक केस गळतीने त्रस्त आहेत.