Pune News : गेल्या काही दिवसांत विशेषतः शाळकरी मुलांमध्ये डोळ्यांची साथ जास्त पसरली आहे. आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणात डोळ्यांची साथ प्रथम आली. त्यानंतर आता ही साथ पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पसरली आहे.
पुणे शहरातही ही साथ पसरल्याने पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक शाळेत तपासणी १ ऑगस्टपासून सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये डोळ्यांच्या साथीचे (आय फ्लू ) रुग्ण वाढू लागले आहेत. आतापर्यंत १००० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यांपैकी १९४ रुग्ण बरे झाले आहेत. बाकीच्या रुग्णांवर उपाययोजना, उपचार करण्यात येत आहेत.
पावसाळ्याच्या काळात विशेषतः साथरोग जास्त प्रमाणात फैलावत असतात. त्यामुळे संसर्गाचा धोका जास्त प्रमाणात असतो. पावसाळ्यात हवेतील ओलाव्यामुळे विषाणूंच्या वाढीस पोषक वातावरण तयार होते. विषाणूंचा प्रसार झपाट्याने होत असल्याने डोळ्यांची साथ येते.
सुरुवातीला केवळ लहान मुलांमध्ये साथीचा प्रादुर्भाव सुरू झाला. आता प्रौढ व्यक्तींमध्येही संसर्ग आढळून येत आहे. मुख्यतः डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळे सुजणे अशी लक्षणे दिसतात.
महापालिकेकडून डोळ्यांच्या साथीच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये डोळे तपासणी अभियान सुरू केले आहे. सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये मुलांच्या डोळ्यांची तपासणी करून सौम्य लक्षणे आढळल्यास तातडीने औषधोपचार सुरू करण्यात येत आहेत. मुलांमध्ये डोळ्यांशी संबंधित कोणताही त्रास दिसल्यास शाळेत पाठवू नये, असे आवाहन पालकांना केले आहे.
काय काळजी घ्यावी?
■ डोळ्यांची स्वच्छता राखा
■ डोळे आल्यास बाहेर जाताना चष्मा घाला
■ टॉवेल आणि कपडे कोणालाही वापरण्यास देऊ नका
■ संसर्ग झाला असल्यास शाळा, महाविद्यालये किंवा कार्यालयातून सुट्टी घ्यावी
■ संसर्ग झाल्यास डोळे दिवसातून दोनदा थंड पाण्याने धुवावेत
■ नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, तसेच आय ड्रॉप तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच वापरावे
■ स्टिरॉइड्स असलेली औषधे वापरू नये